तुरीचे उभे पिक अज्ञातांनी मोडले – जावरा येथील घटना तळेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

0
969

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

अपुऱ्या पावसामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचे चांगले उत्पादन झालेले नाही. तसेच नाफेडच्या अटींमुळे कित्येक शेतकरी आपला माल बाहेरील व्यापाऱ्याला विकत आहे. बाहेर सुध्दा सोयाबीनला भाव नसुन पैशांची गरज असल्यामुळे शेतकऱ्यांना माल विकावा लागत आहे. याच नैराश्येतुन बाहेर निघता यावे म्हणुन अनेक शेतकरी चांगल्या तुरीच्या उत्पादनाची अपेक्षा ठेवत आहे. मात्र हेच तुरीचे उभे पिक तालुक्यातील जावरा येथील शेतकऱ्याचे अज्ञातांनी मोडल्यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट ओढावलेले आहे.

 

प्राप्तमाहितीनुसार, तालुक्यातील जावरा येथील शेतकरी मोरेश्वर केशवराव जांभुळकर (वय – 55) यांचे गावातच गट क्रमांक 61 मध्ये 1 हेक्टर 34 आर शेत आहे. या शेतामध्ये सन 2017-18 या वर्षी सोयाबीन, तुर ही पिके लावलेली होती. सोयाबीनचे पिक निघाल्यानंतर शेतात उभी तुर आहे. शेतातील उभ्या तुरींपैकी तीन ओळींची तुर प्राण्याने किंवा अज्ञात इसमाने मोडली.

 

 

यामुळे एक ते दीड क्विंटल तुरीचे नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे अंदाजे  तीन हजाराचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची तक्रार मोरेश्वर जांभुळकर यांनी तळेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. मात्र चौकशी थंडबस्त्यात असल्याचे दिसते. सदर नुकसान प्राण्यामुळे झाले आहे की कोणत्या इसमाचे हे कृत्य आहे याबाबत अधिक माहिती मिळु शकली नाही. तरी याची योग्य चौकशी करून नुकसान भरपाई म्हणुन आर्थिक मदत देण्याची मागणी मोरेश्वर जांभुळकर यांनी तहसिलदार, वनपरीक्षेत्र अधिकारी, चांदुर रेल्वे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.