उभ्या कापसाच्या पिकावर शेतकऱ्याने मारले व्ही पास – गुलाबी बोंड अळीमुळे पिक झाले होते नष्ट मांडवा येथील प्रकार

0
1204
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) 

गुलाबी बोंड अळीने कापसाच्या पिकावर थैमान घातले असून परिणामी शेतकऱ्यांचे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच या गुलाबी अळीच्या प्रकोपामुळे कापसाचे पिक हातात येत नसल्यामुळे त्रस्त होऊन तालुक्यातील मांडवा गावातील एका शेतकऱ्याने उभ्या पिकावर व्ही पास मारले.

चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील शेतकरी अनिल किसनराव इंगोले (वय – 40) यांनी गावातील गट नंबर 91 मधील स्वत:च्या 8 एकर शेतामध्ये तीन विविध कंपन्यांच्या जातीचे कापसाचे बियाण्याची लागवड केली होती.

सुरूवातीला झाडाची उंची वाढली. मोठ्या प्रमाणात बोंडेदेखील लागले. बोंडाचा आकार ज्याप्रमाणे वाढत जाऊ लागला, तसा प्रत्येक कापसाच्या बोंडामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे बोंड फुटलेच नाही. परिणामी या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले होते. गुलाबी बोंड अळीमुळे कपाशीचे पीक वरून हिरवेगार पण आतून पुर्ण:त नष्ट झाले आहे.

कपाशीचा खरीप हंगाम पूर्णत: हातातून गेला असून कापसाचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी अनिल इंगोले हवालदिल झाले होते. यामुळे त्रस्त होऊन त्यांनी कपाशीचे बोंडही गळू नये, याची काळजी वाहणारा शेतकरी ट्रॅक्टर घालून शेतातील संपूर्ण पीक जमीनदोस्त केले. हातात पिक येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे या शेतकऱ्याने कपाशीच्या उभ्या पिकावर व्ही – पास चालविले. सहा फुटांच्यावर वाढलेली पऱ्हाटी बोंडअळीच्या उत्पातामुळे उपटून टाकण्याचा निर्णय मांडवा येथील शेतकऱ्याने घेतला. मागील वर्षी इंगोले यांना 175 क्विंटल कपासीचे उत्पादन झाले होते व ते गेल्या 10 वर्षापासुन कपासीचे पिक घेत आहे.