संत्र्याच्या सर्वेक्षणाचे आदेश म्हणजे ‘साप गेल्यावर लाठी मारणे’ ! शेतकऱ्यांमध्ये रोष

0
851
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे ( शहेजाद खान) –

बाजारभावाच्या ताळमेळानंतर आंबीया पिकाला शेतकरी अधिक पसंती देतो; परंतु शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा संत्रा हवामानाच्या लहरीपणामुळे गळून पडला. त्यामुळे उरलेला संत्रा मिळेल त्या बाजारभावाने विकून बहुतांश शेतकरी मोकळे झाले; मात्र शासनाने आता ६ नोव्हेंबरला संत्रा गळती सर्वेक्षणाचे आदेश कृषी विभागाला दिले. त्यामुळे आता हे सर्वेक्षण म्हणजे ‘साप गेल्यावर लाठी मारणे’ असल्याची टीका शेतकऱ्यांकडून होत आहे. .
चांदूर रेल्वे ह्या एकट्या तालुक्यात १ हजार ८७८ हेक्टर संत्र्याची लागवड आहे. मागील शासनाच्या राजवटीत फळबाग योजनेसाठी कृषी विभागाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने १०० टक्के अनुदानानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संत्रा लागवड केली; परंतु गेल्या तीन वर्षांपासून शासनाच्या कृषी विभागाकडून या ‘फळबाग योजनेकरीता १०० टक्के अनुदान’ योजनेकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष झाले. यावर्षी आंबीया फळाची गळती दूषित हवामानामुळे मोठ्या प्रमाणात झाली होती. .
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात संत्र्याचा आंबिया बहार आता आला असताना, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने संत्रा बहाराला सुरुवात होते; परंतु चालू वर्षी मे महिन्याच्या शेवटी अवेळी पाऊस आल्याने बहुतांशी भागात मृग संत्राचा बहार फुललाच नाही. यानंतर आंब्याच्या बहारासोबत दुसरा बहार संत्र्याला येत असल्याने शेतकरी याला आंबीया बहार संबोधतात. कृषी विभागाच्या आदेशान्वये कृषी सहाय्यक प्रत्येक गावात जाऊन संत्रा फळ गळतीचे सर्वेक्षण करतील; परंतु शेतात संत्राच नसल्याने हे कृषी विभागाचे सर्वेक्षण एक औपचारिकता ठरल्याशिवाय राहणार नाही..

शासनाकडून संत्रा गळतीच्या सर्वेक्षणाचे आदेश आले आहेत. त्याप्रमाणे गाव शिवारात कृषी सहाय्यक सर्वेक्षण करीत आहे. – दिलीप ठाकरे -(तालुका कृषी अधिकारी चांदूर रेल्वे)

माझा बगीचा व्यापाऱ्यांनी ९ लाखांत मागितला होता; परंतु संत्रा गळती झाल्याने व्यापारी आले नाही. शेवटी चार लाखांतच संत्रा विकणे भाग पडले. – गोविंदराव राठोड . (शेतकरी) सावंगा विठोबा.