जिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्रात टोकन पद्धतीचा शुभारंभ  <●> प्रकल्प आरोग्य यंत्रणांसाठी आदर्श ठरेल – पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील

0
615

अमरावती :- जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रातील टोकन पद्धतीमुळे रुग्णांची माहिती गोपनीय राखण्याच्या हक्काचे जतन होणार आहे. प्रायोगिक तत्वावरील हा प्रकल्प देशातील आरोग्य यंत्रणांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हा रुग्णालयात एचआयव्ही बाधितांसाठीच्या ॲन्टी रेट्रो व्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रात टोकन सिस्टीमचा शुभारंभ आज पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दंतरोग उपचार केंद्राच्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभही करण्यात आला. आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉ. सुयोगा देशपांडे, डॉ. शंतनू राऊत, समुपदेशक उद्धव जुकरे यांच्यासह आरोग्यसेवेतील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

रुग्णांची गोपनीयता कायम राहावी म्हणून थेट नावाचा पुकारा न करता टोकन पद्धत अंमलात आणण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. शासनातर्फे हा प्रकल्प राज्यात सर्वत्र राबवण्याचा निश्चित विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया श्री. पोटे- पाटील यांनी व्यक्त केली. टोकन पद्धतीसाठी एलईडी डिजीटल साधनांचा वापर करण्यात आला आहे. एचआयव्ही बाधित रुग्णांना जलद गतीने सेवा उपलब्ध करुन देण्यातही या पद्धतीचा उपयोग होणार आहे. यावेळी केंद्राच्या अहवालाचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
मौखिक आरोग्य तपासणी अभियानाचा शुभारंभ
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 30 वर्षांवरील मौखिक आरोग्य तपासणी अभियान राज्यभर राबवले जात आहे. तरुण व्यसनाधीनतेला बळी पडू नयेत, तसेच नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी हा महत्वाचा हा कार्यक्रम जिल्हाभर प्रत्येक गावात काटेकोरपणे राबवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
यावेळी श्री. पोटे- पाटील यांनी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भेट देऊन तेथील सेवासुविधांची पाहणी केली.