अवैध गौण खनिज वाहतुक तपासणीच्या ठिकाणी पोलीसांचा अभाव – गौणखनिज वाहतुकदार ट्रक थांबविल्यानंतर तलाठ्यांवर टाकतात दबाव

0
641

चांदुर रेल्वे – ( शहेजाद  खान )  –

अवैध गौण खनिज वाहतुक तालुक्यातुन जोमात सुरू असतांना यावर लगाम बसविण्यासाठी उभारण्यात आलेल्या चेकपोष्टवर चांदुर रेल्वे पोलीसांचा अभाव जाणवत असुन त्याठिकाणी कधी कधी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर ट्रकचालक किंवा त्यांचे सहकारी दबावसुध्दा टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त आवश्यक असल्याचे दिसत आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुक तपासणी करीता बायपास रोडवरील सोनगाव चौफुली येथे चेकपोष्ट उभारण्यात आले असुन दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वाहणांची तपासणी १४ नोव्हेंबरपासुन नियमीत करण्यात येत आहे. सदर चेकपोष्ट वरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्यामुळे व काही वाहने अवैध गौण खनिजाची वाहतुक करीत असल्याचे महसुल विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीवर लगाम बसविण्यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग व महसुल विभाग या तीनही खात्यांचा समावेश करून भरारी पथक नेमण्याबाबत वरिष्ठांकडुन निर्देश देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे चेकपोष्ट वर ठरलेल्या वेळी नियमीतपणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्या स्तरावरवरून करून त्यांना सदर ठिकाणी हजर राहण्याबाबत सुचना द्यावी असे एक पत्र स्थानिक तहसिलदार श्री. राजगडकर यांनी १६ नोव्हेंबर रोजी ठाणेदार श्री. शेळके यांना दिले होते. या पत्राची प्रतिलीपी अमरावती येथील प्रादेशिक परिवहन विभागालासुध्दा पाठविण्यात आली. मात्र या पत्रावर १६ दिवसांचा काळ लोटुनही अद्यापही पोलीसांची नेमनुक करण्यात आलेली नाही. या चेकपोष्टवर अनेकवेळा तलाठी, मंडळ अधिकारी यांची गौण खनिज वाहतुकदारांसोबत बाचाबाची सुध्दा होते. एखादी परीस्थिती या कर्मचाऱ्यांच्या जीवावर सुध्दा बेतु शकते. त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे.

कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे नाही केली नेमनुक – ठाणेदार श्री शेळके

तहसिलदार श्री. राजगडकर यांचे पत्र मला मिळाले असुन मी स्वत: दररोज चेकपोष्ट दोन ते तीन वेळा भेट देत असतो. पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मी त्या ठिकाणी दररोज दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकत नाही. वरिष्ठांचे याबाबत काही आदेश आल्यास त्यावर नक्कीच विचार करू अशी प्रतिक्रीया ठाणेदार शेळके यांनी दिली.