चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) –
महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सोमवार ११ डिसेंबरपासून सुरू झाले. या पार्श्र्वभूमीवर विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबर रोजी विदर्भ बंदची हाक दिली होती. या हाकेला शहरात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य मार्केटमधील दुकाने दुपारपर्यंत बंद होती. तर काहींनी आंदोलक जाताच आपली दुकाने उघडली होती. तसेच अमरावती रोडवरील आठवडी बाजाराजवळील दुकाने उघडीच होती. त्यामुळे शहरात विदर्भ बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला नसुन मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद ठेवणे, व्यापारी प्रतिष्ठाणे बंद ठेवावे असे आवाहन आंदोलनाच्या दोन दिवसांपुर्वीच करण्यात आले होते. या आंदोलनात शहरातील विदर्भाच्या मुद्यावर काम करणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या संघटना सहभागी झाल्या होत्या.