बीओआय अजूनही झोपेत , महाराष्ट्र बँक एटीएम ‘जैसे थे’ !

0
832

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) 

महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये स्लीप्सचा सडा अजुनही तसाच पडलेला असुन अजुन त्यामध्ये वाढ झालेली आहे. मात्र अजुनही संबंधित खाजगी कंपनी अथवा अधिकाऱ्यांना जाग आलेली नसुन चक्क स्वच्छ भारत अभियानाला तिलांजली देत असल्याचे दिसते. तर दुसरीकडे वृत्तपत्रांतुन बातम्या झळकताच बँक ऑफ इंडियाच्या एटीएम खोलीचा दरवाजा दुरूस्त करण्यात आला आहे.
शहरातील महाराष्ट्र बँकेत अनेक महिन्यांपासुन स्लीप्सचा सडा तसाच पडला असुन दिवसेंदिवस या कचऱ्यामध्ये वाढ होत आहे. सदर बाब ही संबंधितांच्या लक्षात आणुन दिली असतांनासुध्दा ते याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. एकीकडे संपुर्ण भारतात स्वच्छता अभियान सुरू असुन स्वच्छतेबाबत जनजागृती सुध्दा करण्यात येत आहे. मात्र स्थानिक महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडवल्याची चित्र दिसत आहे. तसेच या बँकेच्या एटीएमची सुध्दा दुरावस्था झाली असुन याकडे संबंधित अधिकारी कधी लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यासोबतच राम नगर परीसरातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या खोलीचा दरवाजा नादुरूस्त असल्याची बाब वृत्तपत्रातुन संबंधितांच्या लक्षात आणुन दिली असता त्यावर तत्काळ कारवाई करीत दरवाजा दुरूस्त करून ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासुन मुक्त केले आहे.

सुरक्षा रक्षकाची नेमनुक कधी?

शहरातील बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नेमनुक अद्यापही करण्यात आलेली नाही. एटीएम खोलीमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती कधी कधी आतमध्ये प्रवेश करतात. यामुळे एटीएमची गुपीत माहिती दुसऱ्यांच्या लक्षात येऊ शकते व अशामुळेच सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या प्रकारांमुळे एटीएमवर सुरक्षा रक्षकाची नेमनुक करणे गरजेचे आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यावर सुध्दा लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे..