एसबीआयची कॅश डिपॉझीट मशीन अनेक दिवसांपासुन बंद – पासबुक प्रिंटींग मशीनही बंदच. ग्राहकांना होत आहे त्रास

0
714
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान )

स्टेट बँकेच्या खात्यामध्ये केव्हाही पैसे जमा करण्याची यंत्रणा शहरात अनेक महिन्यांपासुन उपलब्ध झाली आहे. सदर मशीन नोटा स्वीकारण्यासह ‘एटीएम’सारखे नोटा देण्याचेही काम करते. परंतु गेल्या काही दिवसांपासुन ही मशीन बंद अवस्थेत पडली आहे. यासोबतच पासबुक प्रिटींग मशीनसुध्दा बंद आहे. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एटीएम (एनी टाईम मशीन) आणि आता सीडीएम (कॅश डिपॉझिट मशीन)मुळे जणू २४ तास स्टेट बँक सुरू असते. या मशीनमध्ये १०० रुपयांपासून ४९ हजार रुपयांपर्यंत पैसे जमा करण्याची सोय आहे. १००, ५०० व २००० किमतीच्या नोटा याद्वारे स्वीकारल्या जातात. डिपॉझीट मशीनमध्ये पैसे जमा करण्यासोबतच पैसे काढण्याचीही सुविधा असते. पण या डिपॉझीट मशीनची काळजी घेण्याबाबत स्थानिक भारतीय स्टेट बँक मात्र कमालीची निष्काळजी असल्याचे दिसत आहे. शहरातील स्टेट बँकेची ही मशिन जवळपास गेल्या १५ दिवसांपासुन बंद आहे. यासोबतच पासबुक प्रिंटींग मशीन सुध्दा बंद असल्याचे समजते. लोकांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेली ही सुविधा बंद पडली की, त्याची सवय झालेल्या आणि त्यावर अवलंबून असलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. डिपॉझीट मशीनमुळे आपल्याच खात्यातील पैसे झटपट आणि कधीही काढण्याची सुविधा मिळत असल्यामुळे अनेक बँक ग्राहकाचे बँकेत जाणे जवळजवळ बंदच झाले आहे. स्टेट बँकेने ‘सीडीएम’ मशिनसह एटीएमच्या बाजूला बसवली आहेत. त्यामुळे जेवढे गर्दी पैसे काढण्यासाठी होत असते आता तेवढीच गर्दी पैसे भरण्यासाठी सुध्दा होत असते. पण या मशिनच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे स्टेट बँकेचे मोठे दुर्लक्ष होत आहेत. लोकांना आता एटीएमबरोबर सीडीएमचीही सवय लागत आहे. त्यामुळे लोकांना २४ तास सुविधा मिळत आहे; पण हीच सुविधा अचानक बंद झाल्यास ग्राहकांचा संताप अनावर होत आहे.  त्यामुळे डिपॉझीट मशीनसह प्रिटींग मशीन तत्काळ दुरूस्तीची मागणी जोर धरत आहे..