शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न- ना. श्री महादेव जानकर

0
812
Google search engine
Google search engine

• मागेल त्याला पोल्ट्री व मागेल त्याला गोटफार्म योजना राबविणार
• पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळावा

भंडारा – राज्यातील पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त होती. परंतु कामाचा व्याप पाहता विभागातील सर्व पदे भरण्यात येतील. त्यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व मत्स्यशेतीकडे लक्ष घालून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उचावण्यावर भर देण्याचा शासनाचा निर्धार आहे. पशुपालकांना या विभागातील योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने मानेगाव (बा.) येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे अयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार डॉ. परिणय फुके, ॲड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा दुग्ध विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी, पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, मानेगावचे सरपंच प्रभाकर बोदेले उपस्थित होते.

दुध उत्पादनावर भर देतांना ना. जानकर म्हणाले की, विदर्भात भंडारा, गोंदिया व गडचिरोली यांचा समावेश नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्ड मध्ये नव्हता. आता या तीनही जिल्हयाचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे दुधाचे उत्पादनात निश्चितच वाढ होईल. महाराष्ट्रात अंडी आंध्र प्रदेशातून मागविण्यात येत होती. परंतु पुढील वर्षात राज्यातच अंडी उपलब्ध करुन देण्यात येतील. पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायाच्या सर्व योजना ऑनलाईन केल्या जातील, असेही ते म्हणाले. यासाठी अर्थसंकल्पात वाढीव मागणी सादर करणार आहे. तसेच मागेल त्याला शेततळे योजनेप्रमाणे मागेल त्याला पोल्ट्री व मागेल त्याला गोटफार्म योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. विभागात तलाव तेथे मासोळी अभियान राबवून मत्स्य व दुग्ध व्यवसायास चालना दिल्याबद्दल त्यांनी विभागीय आयुक्त अनुपकुमार व जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे अभिनंदन केले.

शासनाची पोल्ट्रीमध्ये 20 लाखात 2 हजार कोंबडया उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. या योजनेसाठी सबसिडीवर आधारित राहू नका असे ते म्हणाले. बऱ्याच वेळी अंडी तयार करण्याचे सोडून कोंबडी विक्री करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे योजनेचे स्वरुपच बदलते अशा प्रकारे काम करणाऱ्या पोल्ट्रीवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी शेती सोबतच मत्स्यबीज शेती कडे वळावे. यावर 50 टक्के सबसिडी आहे. तसेच दुग्ध व्यवसाय करुन आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे ना. महादेव जानकर म्हणाले.
आमदार परिणय फुके म्हणाले की, अशा प्रकारचे पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळावे गावोगावी घ्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांना मत्स्यशेती व दुग्ध विकासाचे महत्व कळेल. तसेच या विभागाच्या योजनांची माहिती मिळून त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. आपला जिल्हा धान उत्पादक आहे. धानासोबतच पुरक व्यवसाय म्हणून मत्स्यशेती व दुग्ध व्यवसाय करावा. आपल्या जिल्हयात सव्वातीन लाख दुधाचे उत्पादन होते ते साडेचार लाखावर कसे नेता येईल प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी पशुंना संकरित चारा व नागपूर नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्डात जिल्हयाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हयात दुग्ध उत्पादनाचा मोठा प्रकल्प उभारावा, अशी मागणी त्यांनी मंत्री महोदयांना केली. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, कृषि व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी मार्गदर्शन केले.
प्रस्ताविकास नितीन फुके यांनी प्रदर्शनी व मेळाव्याची माहिती विषद करतांनी सांगितले की, प्रदर्शन व प्रचार कार्यक्रमांतर्गत विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी हा उद्देश आहे. तसेच आदिवासी क्षेत्रबाहय योजना, राजे यशवंतराव होळकर महामेष योजनाची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. त्यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होईल. कृत्रिम रेतनात जिल्हा राज्यात प्रथम असून मानेगाव बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास आय.एस.ओ. मानांकन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पशुपालक व कुक्कुटपालक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या पशुपक्षी प्रदर्शनीत पशुंच्या वेगवेगळया जातीचा समावेश होता. या मेळाव्यास विविध विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी, गावकरी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.