गोंदिया-नागपूर शिवशाही वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ <><> एस.टी.ची प्रवाशांना चांगली सेवा मिळावी – पालकमंत्री बडोले

0
694

गोंदिया :- राज्यात मागील तीन वर्षात मोठे परिवर्तन झाले आहे. परिवर्तनाचा एक भाग म्हणून एस.टी.ने सुध्दा कात टाकली आहे. राज्यात 2 हजार वातानुकूलीत बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागपूरकरीता येथून सुरु होणारी शिवशाही वातानुकूलीत बससेवेचा प्रारंभ हा त्याचाच एक भाग आहे. एस.टी. ही राज्यातील प्रवासाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा एस.टी.ने दयावी अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
24 डिसेंबर रोजी गोंदिया बसस्थानक येथे गोंदिया-नागपूर या वातानुकूलीत बससेवेचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांनी सकाळी 11 वाजता बसला हिरवी झेंडी दाखवून केला. या निमित्त्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केलनका, एस.टी.चे भंडारा विभाग नियंत्रक गजानन नागूलवार, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, गोंदिया आगार प्रमुख जयकुमार इंगोले, नंदकुमार बिसेन यांची उपस्थिती होती.
लवकरच गोंदिया येथून शिर्डी, कोल्हापूर व रायपूरसाठी बससेवा सुरु करणार असल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, या लांब पल्ल्याच्या सेवेमुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यास मदत होईल. एस.टी. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबीत प्रश्न आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक निश्चित करण्यात येईल. एस.टी. तोट्यात का चालते याचा विचार केला पाहिजे. असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव, देवरी व सडक/अर्जुनी येथील बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयी-सुविधेकडे लक्ष दयावे. यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल असे ते म्हणाले.
श्री.बडोले म्हणाले, गावखेड्यातील लोकांचे प्रवासाचे मुख्य साधन ही एस.टी. आहे. ग्रामीण भागातील मुला-मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी एस.टी. हीच मुख्य साधन आहे. गोंदिया ते साकोली दरम्यान ज्या गावांसाठी जलद एस.टी.चे थांबे मंजूर आहे तेथे त्या बसेस थांबल्या पाहिजे. त्यामुळे एस.टी.ला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. सायंकाळी ग्रामीण भागातील काही मुख्य मार्गावर बसेस नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अशाप्रसंगी प्रवाशांना जीव धोक्यात घालून अन्य वाहनाने प्रवास करावा लागतो. ही गैरसोय टाळण्यासाठी एस.टी.ने नियोजन करुन बसेस सोडाव्यात असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, गोंदिया हा राज्याच्या टोकावर असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर या उपराजधानीत रस्त्याने सुखकर पोहोचण्यासाठी ही शिवशाही वातानुकूलीत बससेवा एस.टी.ने सुरु केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगून त्यांनी शिवशाही बससेवेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री.शिवहरे म्हणाले, परिवहन मंत्री व पालकमंत्री यांच्या पुढाकारातून ही शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली आहे. लोकांना चांगली प्रवासी सेवा उपलब्ध व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सुध्दा लक्ष दिले पाहिजे. एस.टी.ला कर्मचाऱ्यांनी चांगले चालविले तर एस.टी. तोट्यात जाणार नाही असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून श्री.नागुलकर म्हणाले, प्रवाशांना चांगली सेवा मिळावी हा या शिवशाही वातानुकूलीत बससेवा सुरु करण्यामागचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुध्दा प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी एस.टी. कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शिवशाही वातानुकूलीत बससेवेला हिरवी झेंडी दाखवून नागपूरकरीता रवाना केले. गोंदिया ते नागपूर दरम्यानच्या 170 कि.मी.च्या प्रवासासाठी या बसचे प्रती प्रवासी भाडे 274 रुपये इतके आहे. गोंदिया बसस्थानकातून दररोज सकाळी 7.45 वाजता पहिली शिवशाही बस सुटेल व नागपूर येथे ती सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तर दुसरी शिवशाही बस ही सकाळी 8.30 वाजता गोंदिया येथून निघून दुपारी 12.15 वाजता नागपूर येथे पोहोचेल. आज या बसचे चालक श्री.पाठक व वाहक म्हणून श्री.पराते होते. दोघांनाही पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. या बसमध्ये इंटरनेटची वायफाय सुविधा तसेच मोबाईल रिचार्जची व्यवस्था असून संपूर्ण बस वातानुकूलीत आहे.
कार्यक्रमाला रतन वासनिक, धनंजय वैद्य, प्रदिपसिंह ठाकुर, जयंत शुक्ला, श्री.सोनवाने, बसस्थानक प्रमुख संजना पटले, वाहतुक नियंत्रक रामजी चतुर्वेदी, श्री.कोसरकर, अर्पित वासनकर, दिलीप राऊत, प्रशांत डोंगरे, सईद खाँ, श्री.जोशी, श्री.भिमटे, शितल बंसोड, श्याम मेश्राम, ललित सोनवणे, गुलाब आडे यांच्यासह बसस्थानकावरील प्रवाशांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार वाहतुक नियंत्रक पी.एन.केळुद यांनी मानले.