दर्जेदार शिक्षण सर्वदूर पोहोचविण्यासाठी ‘व्हर्च्युअल सी४’ उपयुक्त – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे

0
1319
Google search engine
Google search engine

अमरावती :- अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवत ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्यासाठी ‘व्हर्च्युअल सी४’ उपयुक्त ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्हर्च्युअल कॅम्पस टू काॅलेज अँड कम्युनिटी सेंटर (व्हर्च्युअल-सी४), तसेच विद्यापीठाच्या नव्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले की, महाराष्ट्राचा सम्यक विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विदर्भासह सर्व भागात नवनव्या उद्योगांच्या उभारणीसह कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी अनुकूल अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. ‘व्हर्च्युअल सी४’ च्या माध्यमातून विद्यापीठाशी विविध महाविद्यालये थेट जोडली जाऊन सामाजिक व विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वदूर पोहोचू शकेल.

डॉ. चांदेकर यांनी ‘व्हर्च्युअल सी ४’बाबत माहिती दिली. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते मंत्री श्री. तावडे यांना संत गाडगेबाबांचे चरित्र भेट देण्यात आले.