कर्जमुक्ती व हमी भावाच्या प्रश्नासाठी सुकाणू समिती अविरत कार्यरत राहील – डॉ. श्री अजित नवले

0
1481
Google search engine
Google search engine

सुकाणू बरखास्त होण्याच्या बिलकुल शक्यता नाहीत.

 

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शेतकरी कर्जमाफी, हमी भाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व इतर शेतकरी प्रश्नांसाठी स्थापन झालेली सुकाणू समिती अत्यंत गांभीर्याने व नियोजनबद्धपणे शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत तीव्र होत असताना समविचारी शेतकरी संघटनांना एकत्र करत व्यापक एकजूट बांधण्यासाठी सुकाणू समिती काम करत आहे. पुढेही सुकाणू समिती यासाठी संपूर्ण ताकदीने कार्यरत राहील. अशी माहिती शेतकरी संघटनांची सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.

डॉ. नवले म्हणाले की, सुकाणू समितीत सामील असलेल्या नाशिक येथील काही कार्यकर्त्यांमधील स्थानिक मतभेदांमुळे सुकाणू समिती बरखास्त झाल्याचे सांगत काही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे समजते आहे. स्थानिक मतभेदातून ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. राज्य स्तरावरील सुकाणू समितीचा या निर्णयाशी कोणताही संबंध नाही. नाशिक येथील कार्यकर्त्यांनी आजवर शेतकरी आंदोलनात अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेले असल्याने त्यांच्यामधील मतभेदांची सुकाणू समिती नक्कीच दखल घेईल. त्यांनी मांडलेली मते विचारात घेऊन मतभेद दूर केले जातील. सुकाणू समितीच्या एकजुटीला अधिक मजबूत करण्यात येईल. नाशिक येथील सर्व कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची मते जाणून घेण्यासाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिक येथे दिनांक 1 जानेवारी 2018 रोजी सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. सुकाणू समितीत सामील सर्व प्रमुख संघटनांचे नेते व पदाधिकारी नाशिक येथील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. सर्व प्रमुख संघटनांनी सुकाणू समितीच्या माध्यमातून आंदोलन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प अधोरेखित केलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत सुकाणू समितीची एकजूट कायम राहील. सुकाणू बरखास्त करण्याचा निर्णय मुळीच झालेला नाही. नाशिक येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीसाठी सुकाणू समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. अशी माहिती डॉ. नवले यांनी दिली.