युवकांना संधी : विवेकशील समाज घडविण्यासाठी उचलले पाऊल – शासनाचा ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम

0
1335
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने डिजिटल प्रशस्तीपत्र, सोशल मिडिया महामित्र पुरस्कार
• समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत 5 ते 17 मार्च दरम्यान गटचर्चा
• सहभागी होण्यासाठी 1 ते 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी

: राज्य शासनाने आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक कार्यासाठी उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी देवून विवेकशील समाज घडविण्यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र उपक्रम’ राबविण्याचा निर्धार केला आहे.
आधुनिक काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाला आहे. बहुतांश युवक मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया आता मनोरंजनाचे साधन न राहता ज्ञान उपलब्ध करुन घेण्याचे प्रभावी साधन ठरले आहे. लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिध्द झाले आहे. देशातील बहुतांश युवक फेसबुक, व्हॉट्ॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे शासनाने सोशल मीडियाची ताकद जाणून ‘सोशल मीडिया महामित्र’ उपक्रम राबविण्याचा ठरविले आहे.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातून दहा युवकांची सोशल मीडिया महामित्र म्हणून निवड केली जाणार आहे. त्यांना जिल्हास्तरावर समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चेसाठी पाचारण केले जाणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यक्रम 5 ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक, अनुलोम सदस्य, समाजातील प्रतिष्ठित यांच्यासमवेत ही गटचर्चा आयोजित करण्यात येईल. चर्चेअंती प्रत्येक तालुक्यातून एका महामित्राची राज्यस्तरासाठी निवड केली जाणार आहे. यासाठी 1 ते 18 फेब्रुवारीपर्यंत युवकांना नोंदणी करता येणार आहे.
या उपक्रमातील सर्व सहभागींना मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर सहभागींना जिल्हास्तरीय मान्यवरांची भेट वस्तू, लोकराज्य वार्षिक वर्गणी, महाराष्ट्र वार्षिकी पुस्तक तसेच जिल्हाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रशस्तीपत्र व फोटो. राज्यस्तरासाठी निवड झालेल्यांना मुंबईत जाण्यासाठी निमंत्रण, मान्यवरांसोबत सेल्फी, कॉफी, आपले विचार मांडण्याची संधी, मुख्यमंत्री यांचेसोबत फोटो, पारितोषिक व अन्य भेटवस्तू देण्यात येणार आहे. या संधीचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेऊन सोशल मीडिया महामित्र म्हणून पारितोषिक पटकावावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागातर्फे करण्यात आले आहे.

कसे सहभागी व्हावे :-

या उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरिता Google Play store अथवा Apple च्या App Store वर MahaMitra हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे लागेल. या ॲप्लीकेशनमध्ये नाव, वय, पत्ता हे तपशील देऊन नोंदणी करावयाची आहे. ही नोंदणी प्रक्रिया 1 फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून 18 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 15 वर्षावरील रहिवासी नि:शुल्क सहभागी होऊ शकेल.

समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत 5 ते 17 मार्च दरम्यान गटचर्चा :-

राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर समाज माध्यमांच्या सदुपयोगाबाबत 5 ते 17 मार्चच्या दरम्यान गटचर्चा होणार आहे. यात प्रत्येक तालुक्यातील 10 सोशल मीडिया महामित्र सहभागी होतील. यातून तालुक्यातील एकाची राज्यस्तरीय गटचर्चा होईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत ही गटचर्चा आयोजित करण्यात येईल.