एक पुरावा दाखवा, आमदारकी सोडेल – आ. श्री विरेंद्र जगताप

0
710
Google search engine
Google search engine

 

 

पाथरगाव सिंचन तलावाच्या मान्यतेवरून राजकीय वातावरण तापले

अमरावती / शहेजाद खान- 
चांदूर रेल्वे तालुक्यातील २ हजार १६३ हेक्टर क्षेत्राला वरदान ठरलेल्या पाथरगाव सिंचन योजनेला माजी आमदार अरुण अडसड यांनी आजवर विरोधच दर्शविला. असे असताना या योजनेकरिता त्यांनी पाठपुरावा केल्याचा दावा केल्या जात आहे. या दाव्याचे खंडण करीत पाच वर्षात माजी आमदार अरुण अडसड यांनी या योजनेकरिता केलेल्या पाठपुराव्याचा एक पुरावा दाखवावा, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल, असे आव्हान शुक्रवारी आमदार विरेंद्र जगताप यांनी पत्रपरिषदेतुन केले.
पाथरगाव सिंचन योजनेचे श्रेय माजी आमदार अरुण अडसड लाटत असल्याने आ.वीरेंद्र जगताप यांनी आजवर केलेल्या पाठपुराव्याचे पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर केले. अजित पवार जलसंपदामंत्री असताना २१ मे २००८ रोजी आ.वीरेंद्र जगताप यांनी याबाबत दिलेल्या पत्रानंतर २३ डिसेंबर २००८ रोजी राज्यमंर्त्यांनी बैठकीत याबाबत तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. तसेच १३ जुलै २००९ ला शासन निर्णय काढण्यात आला. याचा पुढे पाठपुरावा करीत २ फेब्रुवारी २०१० व १३ एप्रिल २०१० रोजी मुख्यमंत्री यांना दिलेले पत्र. जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांचे याबाबत आ.वीरेंद्र जगताप यांना मिळालेले पत्र, जलसंपदा मुख्य अभियंत्याचे २९ नोव्हेंबर २०१० चे पत्र, २०११ चे राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे पत्र, राज्यमंत्री सुनील तटकरे यांच्या पत्राचा पुरावा आ.वीरेंद्र जगताप यांनी यावेळी सादर केला.

———————————————–

*आमदारांनी राजीनामा आधी स्टँम्प पेपरवर लिहुन द्यावा, त्यानंतर पुरावे सादर करणार – मा. आ. श्री अरूण अडसड*

मला पुरावा मागणाऱ्या आ. जगताप यांनी मतदारसंघात कोणते मोठे काम केले ते आधी दाखवून द्यावे, त्यांना मतदारसंघाचा इतकाच कळवळा होता तर, त्यांची सत्ता असताना या योजनेला आजवर का मान्यता मिळाली नाही. शेवटी आमच्या सरकारनेच पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे याचे श्रेय आम्हाला मिळत असेल तर यात वावगे तरी काय आहे? असा टोला माजी आमदार अरुण अडसड यांनी लगावला. .
आजवर मी केलेल्या कामांची कधीच प्रसिध्दी केली नाही. पाथरगाव व परिसरातील गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. मी त्यांना सांगितले नाही. उरला पुराव्याचा प्रश्न, तर आमदारांनी राजिनाम्याचा इशारा दिला आहे. तो इशारा त्यांनी आधी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावा, मग माझ्याकडे असलेले पुरावे त्यांना सादर करेल, असा दावा देखील अरुण अडसड यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केला. अखेर आमचे सरकार आहे. मी स्वत: मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्री श्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांचे सरकार असताना आमदारांनी गेल्या दहा, बारा वर्षांमध्ये एकही ठोस काम केल्याचे दिसून येत नाही, असा आरोप अडसड यांनी केला. त्यामुळे या आरोपात काहीच तथ्य नसून, मी श्रेयासाठी कधीच काम करीत नाही असे ही श्री अरूण अडसड म्हणाले.