दिल्ली येथे इतिहासात प्रथमच शिवजयंती साजरी होणार !

0
775
Google search engine
Google search engine

कोल्हापूर – शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा वारसा जगभरात पोहोचावा, या उद्देशाने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने प्रथमच राजधानी देहली येथे शिवजयंती साजरी होणार आहे. राजेशाही थाटात १९ आणि २० फेब्रुवारीला देशभरातील इतिहास संशोधक, अभ्यासक, वारकरी आणि कलाकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील सहस्रो शिवप्रेमी देहली येथील सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. येथून १ सहस्र २०० कलाकार देहलीला जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती भव्यदिव्य आणि संपूर्ण देशभर साजरी व्हावी, यासाठी समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत. शिवजयंती हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, अशीही समितीची मागणी आहे. या सोहळ्यामध्ये शोभा यात्रा, शिवजन्मोत्सव, वारकरी दिंडी, लेझीम, हलगी, शाहिरी, मल्लखांब, धनगरी ढोल,  ध्वज, तुतारी अशा विविध कलाकारांचा समावेश असलेल्या पथकांचा समावेश आहे.

१९ फेब्रुवारीला संसदेच्या परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता नवीन महाराष्ट्र सदनामध्ये शिवजन्मोत्सव सोहळा आणि शाहिरी कार्यक्रम होणार आहे. या वेळी पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. इतिहासात प्रथमच ही शोभायात्रा राजपथावरून जाणार आहे. २० फेब्रुवारीला शिवगर्जना हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी प्रथमच आझाद नायकवडे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर हिंदीमध्ये शाहिरी गाण्यांचा खास कार्यक्रमसुद्धा आयोजित केला आहे.