*काॅगेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे यांचे आज पहाटे हृदय विकाराने निधन*

0
794

प्रतिनिधी / उमेर सय्यद नगर   : श्रीरामपूर:- 

 

काॅगेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयंत ससाणे (वय ६०) यांचे आज पहाटे ह्यदय विकाराने निधन झाले. ससाणे हे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिले आहेत . ते  श्रीरामपूर नगरपालिकेचे दहा वर्षे नगराध्यक्ष होते . शिर्डी येथील साईबाबा संस्थाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. सध्या काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते.

ससाणे मागील काही दिवसांपासून आजारी होते. काल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आज पहाटे ससाणे यांना अचानक त्रास होऊन घरीच त्यांची प्राणज्योत मालवली. ससाणे यांनी मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेचे संचालकपद, श्रीरामपूर पिपल्स बॅंकेचे संचालक, महाराष्ट्र प्रदेश युवक काॅग्रेसचे सरचिटणीस, महाराष्ट्र हिंद सेवा मंडळाचे संचालक, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्यपद अशी अनेक पदे भूषविली होती.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ससाणे यांनी बड्या नेत्यांबरोबर राजकीय लढाई करीत राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवले. १९८५ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यांनी काही नगरसेवक एकत्र करून सत्तांतर घडवून आणले होते. त्यानंतर ससाणे यांनाही नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. श्रीरामपूर नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक कामे मार्गी लावली. नगरपालिकेला संत गाडगेबाबा अभियानाचा पुरस्कार चार वेळा मिळवून दिला.

१९९९ मध्ये विधानसभा निवडणुकीत निवडून येत त्यांनी विधानभवन गाठले. मुरब्बी राजकारणी असलेले भानुदास मुरकुटे यांचा पराभव करणारा नेता म्हणून त्यांची ओळख राज्यभर झाली. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी जवळीक साधली.

शिर्डी ते शिंगणापूर रस्ता, शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन, गोंधवणीचे महादेव मंदिर, दत्तनगर व भैरवनाथ नगरला ग्रामपंचायतीचा दर्जा, श्रीरामपूरमधला बगिचा, चाऱ्यांची दुरुस्ती, शेततळी,रोहयोची कामे, सिमेंट बंधारे असे अनेक कामे त्यांनी मार्गी लावली. ससाणे यांच्या पत्नी राजश्री ससाणे याही नगरध्यक्ष होत्या. या दाम्पत्यांच्या काळात श्रीरामपूर नगरपालिकेला चार वेळा स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले. विभागस्तरावरही प्रथम येण्याचा मान मिळाला. याशिवाय अनेक पुरस्काराचे नगरपालिके मानकरी झाली.