इंटरसिटी व जबलपुर एक्सप्रेस २६ फेब्रुवारीपासुन चांदूर रेल्वेत थांबणार – रेल रोको कृती समितीच्या प्रयत्नांना आले अखेर यश

0
1197
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) –
अनेक निवेदने….मोठे जनआंदोलन….रेल्वे प्रशासनाला बेशरमचे झाड भेट….नागपुर मध्य रेल्वे कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा…. रेल रोको कृती समितीच्या या सर्व प्रकारानंतर अखेर रेल्वे प्रशासन नमले आहे. सर्व तांत्रीक बाबी दुर करून अमरावती- अजनी इंटरसिटी एक्सप्रेस व अमरावती – जबलपुर एक्सप्रेसचे चाके २६ फेब्रुवारीपासुन चांदुर रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे. याबाबतचे पत्र मंगळवारी (ता. २०) रेल रोको कृती समितीचे नितीन गवळी यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे मिळाले आहे. यामुळे तालुक्यात सगळीकडे आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले.
           अनेक वर्षांपासुन चांदुर रेल्वे वासीयांची रेल्वे थांब्याची मागणी होती. शहराच्या आजुबाजुने जवळपास ५०-६० खेडे आहे. तसेच तिवसा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काही नागरीकसुध्दा चांदुर रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात. शहरात सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी सर्वप्रथम माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी प्रयत्न सुरू केले होते. यानंतर रेल रोको कृती समितीचे स्व. डॉ. पांडुरंग ढोले, नितीन गवळी यांच्यासह सदस्यांनी अनेक निवेदने, आंदोलने केले. रेल्वे थांब्याची लढाई सुरू असतांना मधातच स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांचे निधन झाले. ज्या दिवशी डॉ. ढोले यांचे निधन झाले, त्यादिवशीसुध्दा ते रेल्वे थांब्यासंबंधी चर्चा करण्यासाठी रेल्वे कार्यालयात जाणार होते. त्यांच्या निधनानंतर ही लढाई थांबु न देता नितीन गवळी यांनी आजपर्यंत सुरू ठेवली. या सगळ्यांच्या प्रयत्नानंतर अखेर चांदुर रेल्वे स्टेशनवर अमरावती- अजनी इंटरसिटी एक्सप्रेस व अमरावती – जबलपुर एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे. नितीन गवळी यांनी रेल्वे मंत्रालय दिल्ली येथे माहितीच्या अधिकारात ३ ऑक्टोबर ला हजारो शहरवासीयांच्या हस्ताक्षराचे रेल्वे थांब्याचे निवेदन मंत्रालयात दिले असता त्यावर काय कारवाई केली याची विचारणा केली. रेल रोको कृती समितीच्या निवेदनाव्दारे केलेल्या मागणीवर मंगळवारी (ता. २०) ला रेल्वे मंत्रालयाचे दोन्ही गाड्यांना २६ फेब्रुवारीपासुन थांबा मिळाल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे आता दोन्ही रेल्वे गाड्या २६ फेब्रुवारीपासुन चांदुर रेल्वेत थांबणार आहे. यामुळे आता प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. रेल रोको कृती समितीच्या प्रयत्नांना आलेल्या यशामुळे नितीन गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
….हीच खरी डॉ. ढोलेंना श्रध्दांजली – श्री नितीन गवळी
चांदुर रेल्वे शहराला विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा स्व. डॉ. पांडुरंग ढोले यांनी मिळवुन दिला होता. यानंतर इंटरसिटी व जबलपुर एक्सप्रेस ला थांबा मिळण्यासाठी स्व. डॉ. ढोलेंनी लढाई सुरू केली होती. ही लढाई सुरू असतांनाच त्यांच्यावर काळाने झळप घातली. त्यानंतर मी रेल रोको कृती समितीच्या माझ्या सदस्यांसोबत लढाई सुरूच ठेवुन अखेर थांबा मिळवुन घेतला. दोन गाड्यांच्या मिळालेल्या थांब्यामुळे हीच स्व. डॉ. पांडुरंग ढोलेंना खरी श्रध्दांजली असल्याचे मत रेल रोको कृती समितीचे सदस्य तथा आम आदमी पार्टीचे अमरावती विधानसभा संयोजक नितीन गवळी यांनी व्यक्त केले. या थांब्यासाठी शहरवासी व खासदार रामदास तडस यांचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.