शासकीय धान्य गोदामपालक कैलास पुरी निलंबीत – जिल्हाधिकारी यांचे आदेश >< धान्य वाटपामध्ये अफरातफरी व अनियमितता भोवली

0
896
चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) –
      शासकीय धान्य गोदामामधील धान्य वाटपात अफरातफरी व अनियमितता आढळल्यामुळे गोदामपालक कैलास पुरी यांना जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या आदेशाने निलंबित करण्यात आले आहे.
      जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केल्याप्रमाने, १ फेब्रुवारी रोजी निरीक्षण अधिकारी पी. जी. देशमुख व पुरवठा निरीक्षक एस. पी. ढगे यांनी शहरातील भूत पेट्रोल पंपावर द्वारपोच योजनेचे वाहन क्रमांक एम एच ३० / एल ९३० या उभ्या असलेल्या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये १० कट्टे गहु व ५ कट्टे तांदुळ (शासकीय) आढळुन आला होता. परंतु सदर वाहनामध्ये
 ११५ कट्टे भरणे अपेक्षित होते. पण शासकीय धान्य गोदामपालक कैलास पुरी यांनी तसे न करता गेट पास १३० कट्ट्यांची (३७.७२ क्वि. + २०.४० क्वि. + ७.५३ क्वि.) धान्य भरून दिले होते. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शासकीय धान्य गोदाम, चांदुर रेल्वे ची तपासणी केली असता गोदामात दैनिक अहवालानुसार सर्व योजनेचा गहू ११३२.७० क्विंटल म्हणजेच गव्हाचे कट्टे २२६५ असणे आवश्यक असतांना प्रत्यक्षात गव्हाचे कट्टे २२६६ म्हणजेच एक कट्टा जास्त आढळला. त्याचप्रमाणे सर्व योजनेचा तांदूळ दैनिक अहवालाप्रमाणे १०३७.९५ क्विंटल म्हणजेच तांदुळाचे कट्टे २०७६ गोदामात असणे आवश्यक होते. प्रत्यक्षात तांदुळाचे कट्टे २०७८ म्हणजेच दोन तांदुळाचे कट्टे जास्त आढळून आले. शासकीय धान्य गोदाम, चांदूर रेल्वे येथे गोदामातील धान्याचे चाचणी वजन केले असता तपासणी अंती प्रत्यक्षात सर्व योजनेचा गहू ११२४.०६६ क्विंटल म्हणजेच ८.६३४ क्विंटल गहू कमी आढळला. तसेच सर्व योजनेचा तांदूळ १०२८.७० क्विंटल म्हणजेच ९.२४४ क्विंटल तांदूळ कमी आढळून आला. तसेच कट्ट्याचा विचार करता १ कट्टा गहू व २ कट्टे तांदूळ जास्त आढळून आले. यावरून हेतुपुरस्परपणे गोदाम पालक कैलास पुरी हे प्रत्येक पोत्यामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम धान्य कमी ठेवून धान्याच्या वाटपामध्ये अनियमितता करीत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कैलास पुरी यांना खुलासा सादर करण्याची संधी तहसील कार्यालयातर्फे देण्यात आली होती. यावरून कैलास पुरी यांनी २७ फेब्रुवारी रोजी लेखी खुलासा सादर केला, परंतु सादर केलेला खुलासा संयुक्तिक नसल्यामुळे गोदाम पालक कैलास पुरी हे शासकीय धान्य गोदाम चांदुर रेल्वे येथे धान्यसाठ्यात झालेल्या अफरातफरीस सकृत्दर्शनी जबाबदार असून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम ३ (एक) (दोन) (तीन) चा भंग केल्याचे निदर्शनास आले. त्याअर्थी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून गोदाम पालक कैलास पुरी यांना जिल्हाधिकाशी अभिजीत बांगर यांनी निलंबित केले. तसेच शासकीय धान्य गोदाम चांदुर रेल्वे येथे कमी आढळलेले धान्य याची एकूण किंमत ५२ हजार ९७१ रूपये ही रक्कम शासनास झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून गोदाम पालक कैलास पुरी यांच्याकडून वसूल करण्याचा आदेशही पारित करण्यात आला आहे.