न्यायालयाचा १२ अधिकाऱ्यांना दणका

0
738

 

न्यायालयाचा १२ अधिकाऱ्यांना दणका

परळी : जलयुक्त शिवार योजनेतील कामात २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरुन कृषी विभागाच्या २४ अधिकारी आणि कर्मचा-यांवर परळी शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी १२ अधिका-यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या सर्वांचे अर्ज दि. २१ मार्च रोजी न्यायालयाने फेटाळले.

सन २०१५-१७ मध्ये परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करण्यात आली. या कामात २ कोटी ४१ हजार ६७२ रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार ७ मार्च २०१८ रोजी परळीचे तालुका कृषी अधिकारी भीमराव बांगर यांनी दाखल केली. त्यावरुन २४ अधिका-याच्या विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ८ मार्चपासून यातील आरोपी हे फरार झाले आहेत. यातील १२ जणांचे अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज वकिलामार्फत अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्या. एस.व्ही.हंडे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या अर्जावर २१ मार्च रोजी सुनावणी होऊनसर्च्या सर्व १२ अटकपूर्व जामिनीचे अर्ज नामंजूर करण्यात आले, अशी माहिती सहायक सरकारी वकील अ‍ॅड. लक्ष्मण फड यांनी दिली.

बुधवारी जामीन अर्ज नामंजूर झालेल्यात सूर्यकांत आवाड, अमोल कराड, बाबूराव पवार, बालाप्रसाद केंद्रे, अरविंद सूर्यवंशी, नवनाथ नागरगोजे, त्रिंबक नागरगोजे, अजित गिरी, दिलीप काळदाते, शिवाजी हजारे, सुनील गित्ते या १२ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.