बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या नवीन घरावर धर्मांधांचे आक्रमण

0
1308
Google search engine
Google search engine

 

ढाका – बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांच्या घरावर २५ मार्चला रात्री सुमारे १२.१५ च्या सुमारास सुमारे १०० धर्मांधांनी आक्रमण केले. अधिवक्ता घोष यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू होते. त्या वेळी धर्मांधांनी तेथे असलेल्या साहित्याची नासधूस केली, तसेच तेथे ठेवण्यात आलेल्या शिवाच्या मूर्तीची तोडफोड केली. तेथे काम करणार्‍या कामगारांनाही मारहाण करण्यात आली. शहरातील कालूनगर भागात ही घटना घडली.

भूमी बळकावण्यासाठी आक्रमण

वर्ष २०१० मध्ये अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष यांनी घर बांधण्यासाठी येथे जमीन विकत घेतली. अलीकडेच अधिवक्ता घोष यांनी या घराच्या बांधकामास आरंभ केला. या जमिनीवर काही धर्मांधांचा डोळा होता. काहींनी अधिवक्ता घोष यांना ‘जिझिया कर भरा’, अशी धमकी दिली होती. या धमक्यांना अधिवक्ता घोष यांनी भीक न घातल्यामुळेच धर्मांधांच्या जमावाने हे आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी तेथील हिंदु कामगारांना एका खोलीत कोंडून ठेवले. त्यानंतर बांधकामासाठी आणलेले सीमेंट आणि इतर साहित्य लुटले. या वेळी धर्मांधांनी कामगारांकडील ७ भ्रमणभाषसंच चोरले. प्राथमिक अंदाजानुसार या आक्रमणामुळे एकूण ६ लाख ५० सहस्र टकांची (५ लाख १० सहस्र ४०० रुपयांची) हानी झाली. या प्रकरणी सौ. कृष्णा घोष यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. हे आक्रमण झाले, त्या वेळी अधिवक्ता घोष हे घटनास्थळी नव्हते.

दोषींवर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्‍वासन

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल यांनी अधिवक्ता घोष यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली आणि संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. ‘या प्रकरणी संबंधितांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच या धर्मांधांकडून कामगारांना झालेली हानीभरपाई वसूल करावी’, अशी मागणी बांगलादेश मायनॉरिटी वॉचने केली आहे. या घटनेचा बांगलादेशातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही निषेध केला आहे.