समाजासाठी काम करणा-या महिलांचे कार्य प्रेरणादायी – ना. पंकजाताई मुंडे
न्यूज १८ लोकमत’ च्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा मुंबईत मुक्ता सन्मानाने गौरव
बीड: दिपक गित्ते
दि. २८ —– समाजातील वंचित घटकांसाठी काम करणा-या महिलांचे कार्य प्रेरणादायी आहे, त्यांच्यामुळे आम्हा राजकारण्यांनाही स्फुरण येते. या सर्व महिला माझ्यासाठी वंदनीय आहेत अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी समाजकार्य करणा-या महिलांचा गौरव केला.
न्यूज १८ लोकमत वाहिनीच्या वतीने ना.पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नऊ कर्तृत्ववान महिलांना ‘ मुक्ता सन्मान ‘ देऊन मंगळवारी गौरविण्यात आले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमये, राष्ट्रवादी महिला काॅग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, वैजयंती कायगांवकर आदी उपस्थित होत्या.
शेती, प्रशासन, सेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान, चाकोरीबाहेरचं काम, सामाजिक संस्था, जन आंदोलन आणि जीवनगौरव या श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रामुख्याने दिले गेले. महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभर नामांकनांमधून तज्ज्ञ परिक्षकांच्या निवड समितीनं या पुरस्कारांची निवड केली. मेळघाटमध्ये अतुलनीय कार्यासाठी डाॅ. स्मिता कोल्हे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शेतीमध्ये अतुलनीय कार्य करणा-या अकोल्याच्या ज्योती देशमुख, रूढी परंपरेविरोधात लढा देणा-या पुण्याच्या नंदिनी जाधव, सेवा विभागातील कार्यासाठी धुळ्याच्या सूर्यप्रभा जैन, प्रशासनातील उल्लेखनीय कार्यासाठी मुंबईच्या रेखा मिश्रा, विज्ञान विभागातील अतुलनीय कार्यासाठी सविता रहांगडाले, आपल्या वेगळ्या वाटेवरच्या कामासाठी डाॅ. विनया जंगले, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या पारोमिता गोस्वामी आणि पुण्याच्या कष्टकरी पंचायत या संस्थेला त्यांच्या कार्यासाठी मुक्ता सन्मानाने गौरविण्यात आले.