*जल संवर्धनासाठी समर्पित शिक्षकाचा अनोखा वाढदिवस*

0
729
Google search engine
Google search engine

अकोला(संतोष विणके )÷

वेळ सकाळी 6.00 वाजता…स्थळ तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं आदीवासी चंदनपूर गाव. आणि गावकऱ्यांची लगबग सुरु एका अनोख्या वाढदिवस सेलिब्रेशनसाठीची ….गुरुजी शाळेत येताच ते पण आश्चर्यचकीत झाले…कारण हा अनोखा वाढदिवस होता पाणी चळवळीसाठी झटणाऱ्या जि.प.शिक्षक तुळशीदास खिरोडकार या उपक्रमशील व्यक्तीमत्वाचा..

लोकं संध्याकाळी वाढदिवस साजरा करतात इथं भल्या पहाटे तयारी…
लोकं केक कापतात. इथे शेतात पिकवलेलं टरबूज…अन त्यावर लिहलं होतं दुष्काळ..
मेणबत्त्यांऐवजी दिवे..
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे,
गिफ्ट्स चे मोठ्ठाले बॉक्स !

हे गिफ्ट्स काय असावेत याचा अंदाज कुणालाच येत नव्हता.
कारण सगळंच उलट आणि अकल्पित…
मग गिफ्ट कसं कॉमन असेल ?
तसं ते नव्हतंही…
कारण ते ज्याचा वाढदिवस आहे, त्याच्याऐवजी गावकऱ्यांसाठी होतं.

गुरूजींच्या गावाला वॉटरकप स्पर्धेत यश मिळावं यासाठी गुरुजी ज्या सामाजिक संस्थेशी जुळलेले आहेत, त्या जागर फाउंडेशनने गावकऱ्यांना मदत व्हावी म्हणून हायड्रोमार्कर, कुदळ, फावडे, टोपली, गावात गळणाऱ्या नळांसाठी नवीन तोट्या असं भलंमोठ्ठं साहित्य गिफ्ट स्वरूपात दिलं.

गुरूजींच्या मित्रांनी दाखवलेल्या या प्रेमापोटी गावकरी तर खूष झालेच. पण आपल्या उद्दिष्टावर काम करण्यासाठी न मागता मिळालेली मदत वाढदिवसाच्या औचित्ताने भेट स्वरूपात मिळाल्याने गुरुजींच्या आनंदालाही पारावार उरला नाही..

असा हा अनोखा वाढदिवस गावकऱ्यांना जोष आणि गुरुजींचा उत्साह वाढवून गेला. सर्वांना प्रतिक्षा आहे ती आता प्रत्यक्ष पाणी जिरवणाऱ्या श्रमदानाची.