सागर गाढवेसह इतर आरोपी अजुनही फरार – त्या चौघांना ८ एप्रील पर्यंत न्यायालयीन कोठडी >< चांदूर रेल्वे शहरातील हत्याप्रकरण

0
656
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 
      कर्जाचे दस्तऐवज तयार करून देण्यासाठीच्या कारणावरून झालेल्या वादात १० ते १५ जणांनी एका इसमावर १४ मार्च रोजी प्राणघातक हल्ला केला होता. हल्ल्यातील जखमीचा नागपूर येथे उपचारादरम्यान १६ मार्च रोजी मृत्यू झाला, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून एकुण सहा आरोपींना अटक केली असुन त्यांना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील सागर गाढवेसह इतर आरोपी अजुनही फरार आहे.
       या प्रकरणात मृतकामध्ये पंडित विक्रम पाटणकर (४५) रा. शिरजगाव ता. मोर्शी  तर फिर्यादीमध्ये गौरव सुरेश तिडके (२७) रा. लक्ष्मीनगर, अमरावती यांचा समावेश आहे. गौरव व त्याचा साथीदार पाटणकर यांना १४ मार्च रोजी आरोपींनी बेदम मारहाण करून त्यांना अमरावतीला सोडुन पळ काढला होता. या प्रकरणी १५ मार्च रोजी नागपूर आरोग्य विभागाने पोलिसांना याची माहिती दिली होती. या प्रकरणात पाटणकर यांचे मृत्युपूर्व बयाणसुद्धा नोंदविण्यात आले. मृतक व फिर्यादीचे शोभा नगरातील न्यु आविष्कार मल्टिसर्व्हिसेस मार्गदर्शन केंद्र आहे. तेथे बँकेचे कर्ज काढण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जात होते. यासंबंधी चांदूर रेल्वे येथिल मारवाडीपुरा येथील सिताराम दुबे यांच्या पत्नीने पाटणकर आणि तिडके यांच्याकडे कागदपत्र तयार करण्यासाठी संपर्क केला होता. त्याचा खर्च सुद्धा दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. परंतु मार्च महिना असल्याने त्यांचे काम पूर्ण न झाल्याने सिताराम यांच्या मुलाने तिडके यांना धमकाविले. १३ मार्च रोजी शुभम दुबे व त्याचा मित्र वैभव पांडे यांनी तिडके यांच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीलाही धमकाविल्याची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी (ता. १४ मार्च) शुभम, वैभव त्यांचा आणखी एका सहकाऱ्याने इर्विन चौकात भेटुन त्यांनी पाटणकर व तिडके यांना चांदूर रेल्वेला घेऊन गेले. दरम्यान चांदूर रेल्वे बायपास येथील लिटिल स्टार कान्व्हेंट जवळील खुल्या मैदानावर मारहाण केल्याची माहिती आहे. यामध्ये पाटणकर याचा मृत्यु झाला.
     या प्रकरणी विजय कालकाप्रसाद तिवारी (४०), विजय ललताप्रसाद उपाध्याय (३०), शुभम सिताराम दुबे, वैभव पांडे, रितेश बनारसे,  सागर पांडुरंग गाढवे (३०), मनीष रतनलाल उपाध्याय (३०), चेतन भांकरलाल रॉय (२८), पवन सुरेशसिंह ठाकुर ( ३२), राजा विष्णुपंत राऊत (२४ रा. सर्व चांदुर रेल्वे व राहुल तांडेकर रा. चांदूरवाडी आदींवर हत्येचा गुन्हा नोंदविला होता.
     या ११ पैकी विजय तिवारी, विजय उपाध्याय या आरोपींना सर्वप्रथम अटक करून त्यांना ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर शुभम दुबे, पवन ठाकुर, चेतन रॉय, राजा राऊत यांना अटक केली असता त्या चौघांनाही ८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यामध्ये सागर गाढवे सह ४ आरोपी अजुनही फरार आहे. या ११ आरोपीनंतरही सदर प्रकरणामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविल्या जात होती. त्यामुळे सर्व ११ आरोपींना अटक झाल्यानंतर इतर अजुनही आरोपींना अटक होणार का? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.