शासनाच्या पत्रकारांसाठी आरोग्यापासून गृहनिर्माण पर्यंत अनेक योजना-देवेंद्र भुजबळ

0
1442
Google search engine
Google search engine

 

शासनाच्या पत्रकारांसाठी आरोग्यापासून गृहनिर्माण पर्यंत अनेक योजना-देवेंद्र भुजबळ

बीड: नितीन एस ढाकणे, दिपक गित्ते

बीड -महाराष्ट्र शासनाने पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची परिपूर्ण माहिती घेऊन अधिस्वीकृती पत्रिका बरोबरच आरोग्य, घरकुल आणि जिल्हा व तालुकास्तरावरील पत्रकार भवन या योजनांसह उत्कृष्ट लेखनासाठीच्या स्पर्धांमध्येही सहभागी होऊन आपल्या हक्काच्या सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन औरंगाबाद विभागाचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केले. बहुतांशी वेळा योजनांची माहिती नसल्यामुळेच पत्रकारांना लाभ मिळू शकत नसल्याचे अनेकदा समोर आल्याची पुष्ठीही त्यांनी जोडली. तर पत्रकारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासकीय अधिकारी असताना भुजबळ यांची तळमळही कौतुकास्पद असल्याची विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले.

बीड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संवाद कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ यांनी पत्रकारांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजना याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर, मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल महाजन, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, सुभाष चौरे, ज्येष्ठ छायाचित्रकार विश्‍वनाथ माणुसमारे, अ‍ॅड.शेखर कुमार आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना देवेंद्र भुजबळ यांनी प्रत्येक शासन समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवत असते.

 

पत्रकारांसाठीही शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. यात प्रामुख्याने अधिस्वीकृती पत्रिका मिळाल्यानंतर बसमध्ये मोफत तर रेल्वेमध्ये पन्नास टक्के सवलत. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये गेल्यानंतरही त्या राज्यातील सेवांचा लाभ अधिस्वीकृती धारक पत्रकारांना मिळतो. पूर्वी कोटा पध्दतीमुळे अधिस्वीकृती मिळण्यात अडचण होती. मात्र आता समितीने निर्णय घेऊन यात सुधारणा केल्यामुळे तालुका पातळीवरील पत्रकारांनाही पत्रिका मिळणे सोपे झाले आहे. योग्य पध्दतीने माहिती घेऊन कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पत्रिका मिळते. त्याचबरोबर आरोग्यासाठी शासनाने शंकरराव चव्हाण मदत निधी कोष तयार केला असुन यातुन दुर्धर आजारांसाठी पत्रकारांना मदत केली जाते. त्याचबरोबर शासनाच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत म्हाडाच्या गृहनिर्माणमध्ये पत्रकारांसाठी दोन टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई, पुणे सह मोठ्या शहरांमध्ये याचा पत्रकारांना मोठा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर आता आरोग्य सुविधांमध्ये पत्रकारांबरोबर त्यांच्या कुटुंबियांनाही लाभ मिळेल अशी दुरुस्तीही करण्यात आली आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर पत्रकार भवन बांधण्यासाठी शासकीय जागा तसेच गृहनिर्माणसाठीही शासकीय जागा देण्यात येतात. यासाठी केवळ स्थानिक पातळीवर पत्रकारांनी एकत्र येऊन योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. बहुतांशी ठिकाणी पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटनांमुळे एकमत होत नाही आणि हक्कांच्या योजनांपासून सर्वसामान्य पत्रकार वंचित राहतात अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर शासनस्तरावर विविध स्पर्धातून पत्रकारांना बक्षीस दिले जातात. त्यातही पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

 

तर वसंत मुंडे यांनी अधिस्वीकृती पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाच वर्गवार्‍या करुन मोठ्या संख्येने पत्रकारांना पत्रिका देण्यासाठी नियमात दुरुस्त्या करण्यात आल्याचे सांगुन विशेषतः तालुका पातळीवरील पत्रकारांना ही अधिस्वीकृती मिळण्यासाठी अनेक बदल करण्यात आल्याने प्रक्रिया सोपी झाल्याचे स्पष्ट केले.

प्रशासकीय यंत्रणेत पत्रकारांना योजनांची माहिती देण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. मात्र देवेंद्र भुजबळ यांनी अनेक ठिकाणी जाऊन पत्रकारांना शासनाच्या योजनांची माहिती देऊन जागृत करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मुंडे यांनी सांगितले. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पत्रकारांनी एकत्र आल्यानंतर या क्षेत्रात काम करणार्‍या सर्वसामान्य पत्रकारांना चांगली मदत होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी प्रास्तविकात देवेंद्र भुजबळ यांचा परिचय करुन दिला. यावेळी अधिस्वीकृती समिती सदस्य अनिल वाघमारे, संपादक सतिषशेठ बियाणी, रामचंद्र जोशी, नागनाथ जाधव, सुरेश जाधव, सुदाम चव्हाण, विकास माने, संतोष केजकर, महेश जोशी, बापुसाहेब खाकरे, नितेश उपाध्य, महेश शेटे, डॉ.शाम रत्नपारखी, प्रचंड सोळंके, विलास सोळंके, अनिल अष्टपुत्रे, सुभाष सुतार, प्रकाश काळे व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.