लोकांपर्यंत आता खरा विकास पोहोचतोय – ना. पंकजाताई मुंडे

0
981

लोकांपर्यंत आता खरा विकास पोहोचतोय – ना. पंकजाताई मुंडे

गाव  तिथे विकास दौ-यात जागच्या जागी प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थ आनंदले

प्रतिनिधी नितीन ढाकणे व दिपक गित्ते

परळी दि. ०३ – लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी विकासाचा सागर पाठवला खरा पण त्यावेळी ज्यांच्या हातात कारभार होता त्यांनी विकासाच्या रांजणाला जागोजागी छिद्र पाडल्याने जनतेपर्यंत योजना गेल्याच नाहीत, त्यामुळेच परिवर्तन करून त्यांनी मला राजकारणात आणले. त्यांना अभिप्रेत असणारा ग्रामीण भागाचा विकास मी सत्तेच्या माध्यमातून करत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणून दिसणारी कामे होत असल्याने आता कुठे खरा विकास लोकांपर्यंत पोहोचत आहे, विकासाची ही गंगा यापुढेही अशीच वाहत राहील अशी ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी दिली.

गांव तिथे विकास दौरा अंतर्गत आज मालेवाडी तांडा, मालेवाडी, वनवासवाडी,मैंदवाडी, दौंडवाडी, आनंदवाडी, नागदरा, लाडझरी, लेंडवाडी, चांदापूर आदी ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. दौ-यात भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, महिला आयोगाच्या गयाताई कराड, ज्येष्ठ नेते श्रीहरी मुंडे, श्रीराम मुंडे, राजेश गिते, सुधाकर पौळ, प्रा. बिभीषण फड, लक्ष्मीकांत कराड, फुलचंद मुंडे,  यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, परळी मतदारसंघ माझी आई आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी या पदावर आहे त्यामुळे या माझ्या परळीचा विकास करण्यासाठी मी मुलगी या नात्याने नुसती साडी नाही तर पैठणी घेऊन आले आहे. माझ्या विकासाच्या बाबतीत फाटक लुगडं असणाऱ्या परळीला मी विकासाने आणि चांगल्या विचाराने सजवणार आहे.सामान्य माणसाच्या दारापर्यंत विकास गेला पाहिजे हे मुंडे साहेब नेहमी सांगायचे, त्यांचे अधुरे काम मला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी मी दिवस रात्र काम करत आहे. या परळी मतदारसंघात याआधी विकास कामे फक्त कागदावर झाली ती तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचलीच नाही. पण आता तसे होणार नाही ज्या गावाला जाण्यासाठी रस्ता नव्हता अश्या गावात आता घरापर्यंत रस्ते करण्यात आले आहेत.

विरोधकांशी खंबीरपणे लढेन पण तुमची साथ महत्वाची

मी हा विकास दौरा सुरू केला तो भाषण किंवा भूलथापा मारण्यासाठी नाही तर तुमच्याशी बोलण्यासाठी,तुमच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी काय केलं हे सांगण्यासाठी सुरू केला आहे. विकासाचे भरलेले ताट मी तुमच्या दारात-घरात आले आहे. त्यामुळे या विकासापासून कुणीही वंचित राहणार नाही असा शब्द मी तुम्हाला देते. कागदावर नाहीतर डोळ्याला दिसेल असा खरा विकास मी तुमच्या पर्यंत आणला आहे. त्यामुळे परळीचा विकास कुठेच थांबणार नाही. तुमची साथ अशीच माझ्या पाठीशी खंबीरपणे असेल तर मी कोणताही आणि कसलाही संघर्ष करण्यास माझी तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.

जागच्या जागी प्रश्न मार्गी

गांव तिथे विकास दौरा काल रात्री दहा वाजता नंदागौळ येथे पोहोचल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी तेथील ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. गांवात मंजूर केलेल्या व झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांची माहिती दिल्यानंतर कांही समस्या गावक-यांनी मांडल्या. त्यात परळी-पुस-बर्दापूर हा नंदागौळ मार्गे जाणारा रस्ता काही तांत्रिक बाबीमुळे रखडला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले तो प्रश्न लगेच उपस्थित अधिका-यांना सांगून मार्गी लावला त्याचप्रमाणे इतर रस्ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. याशिवाय परिसरात सुरू असलेली अवेध दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधिका-यांना सूचित केले. जागीच प्रश्न मार्गी लावल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते.