अनुभवी अधिकारी हीच महसूल खात्याची ताकद – जिल्हाधिकारी  >< उपजिल्हाधिकारी उरकुडे यांना निरोप

0
1135
Google search engine
Google search engine

भंडारा:- शासनाच्या विविध विभागात समन्वय साधण्याचे महत्वाचे काम महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागात काम करतांना विविध विषय हातळण्याचा अनुभव प्राप्त होत असतो, असे अनुभव प्राप्त अधिकारीच महसूल खात्याची ताकद आहे. उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे यांनी निवडणूक शाखेत अतिशय उत्तम काम केले असून त्यांचा अनुभवाचा फायदा या पुढेही मिळत राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
उपजिल्हाधिकारी विजय उरकुडे हे नियत वयोमानानुसार 31 मार्च2018 रोजी निवृत्त झाले असून त्यांचा आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. उपवन संरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे, अधिक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी सुजाता गंधे, शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे व सर्व तहसिलदार यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, माणसाच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्याच्या कामात उमटत असते. विजय उरकुडे यांनी महसूल खात्याची उत्तम सेवा केली असून त्यांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असाच आहे. निवडणूक शाखा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळून उरकुडे हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिळत राहणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शाल, श्रीफळ व भेट वस्तु देऊन विजय उरकुडे यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देतांना विजय उरकुडे म्हणाले की, शासन सेवेत आल्यानंतर महसूल विभागाने आपल्याला ओळख दिली. या खात्याने खुप अनुभव दिले. शासनात खुप काही शिकता आल्याचा आनंद आहे. शासकीय सेवेत बरे वाईट असे अनेक अनुभव आले असले तरी चांगले अनुभव कायम स्मरणात राहीले आहेत. शासन सेवेत असंख्य चांगली माणसं भेटली असून विद्यमान जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या रुपाने अतिशय मनमिळावू व अनुभव संपन्न नेतृत्वात काम करण्याचे भाग्य लाभल्याचे उरकुडे म्हणाले.
शासन सेवेत निवृत्ती अपरिहार्य असली तरी काही अधिकारी त्यांच्या कामामुळे कायम स्मरणात राहतात. त्यांचे अनुभव येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असतात. असेच व्यक्तीमत्व विजय उरकुडे असून त्यांच्या सोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतांना अनेक बाबी अनुभवायला मिळाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसिलदार गजेंद्र बालपांडे यांनी यावेळी आपले अनुभव सांगितले. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.