परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदार संघातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता दहशतीखाली

0
634

परळी, केज, अंबाजोगाई, माजलगाव मतदार संघातील वाढत्या गुन्हेगारीमुळे जनता दहशतीखाली

प्रतिनिधी:

बीड -परळी, माजलगाव, अंबाजोगाई, धारुर, केज, वडवणी या तालुक्यात अवैध गुटखा विक्री, पत्त्याचे क्लब, जुगार, मटका बेकायदेशीर दारु विक्री, वाळू तस्करी आदी बेकायदेशीर धंदे राजरोसपणे चालू असून या तालुक्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे

माजलगाव तालुक्यात बेसुमार वाळू उपसा करणार्‍या वाहनांची भरधाव वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असून यात अनेक लोकांचे अपघातात बळी गेले आहेत. दिवसा ढवळ्या अवैध वाळू तस्करी महसुल व स्थानीक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चालू आहे. परळी, अंबाजोगाई, केज येथे मोठ-मोठे जुगाराचे अड्डे, गुटख्याची तस्करी, अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली असून तरुणाई व्यसनाच्या आहारी चालल्याने अनेकांचे संसार उध्दवस्त होत आहेत. अशीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात धारुर व वडवणी तालुक्यात पण आहे. महिला – मुलींचे विद्यार्थीनींचे रस्त्याने फिरने अवघड झाले असून छेड-छाडीच्या वाढत्या घटनेने भितीचे वातावरण निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अशी तक्रार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक बीड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून वरील तालुक्यातील वाळू तस्करी, गुटखा तस्करी, मटका, जुगार, पत्त्याचे क्लब, तत्काळ बंद करण्याचे संबंधीत यंत्रणेस आदेश देवून हे अवैध धंदे तत्काळ बंद करावेत व दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा बीड जिल्हा शिवसेना प्रत्येक तालुक्यातील पोलिस स्टेशन समोर ढोलबजाव आंदोलन करुन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा उभा करुन निषेधाच्या घोषणा करुन तीव्र निदर्शने व आंदोलने करील असाही इशारा सचिन मुळूक यांनी दिला आहे. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई संजय महाद्वार, बाळासाहेब आंबुरे, योगेश नवले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.