ग्रामीण संस्कृतीचा ठेवा जोपासणारी गोविंदगिरी भैरवनाथ यात्रा!!

0
942
Google search engine
Google search engine

सांगली/कडेगाव/ हेमंत व्यास:-

हजारो यात्रा शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी कडेगाव नगरीची भैरवनाथ गोविंदगिरी यात्रा म्हणुनच दक्षिण महाराष्ट्रात लोकप्रिय झाली आहे. या यात्रेचे वेगळेपण व खास वैशिष्ट्ये समजावुन घेणे मनोरंजक ठरेल.यंदा दि.२८ मार्च ते ०६ एप्रिल २०१८ अखेर ही यात्रा संपन्न होत आहे.पंचेचाळीस वर्षापूर्वी भैरवनाथ यात्रा वैशाख वद्य अष्टमीला भरत होती.शिवरात्र बारशी दिवशी गोविंदगिरी महाराजांची पुजाअर्चा होवून त्यांच्या पादुकांची बैलगाडीतुन मिरवणुक निघत होती.त्रेचाळीस वर्षापूर्वी कडेगाव नगरीचे तत्कालीन सरपंच व यात्रा समितीचे चेअरमन पांडुरंग गोविंद डांगे बापु यांनी भैरवनाथ व गोविंदगिरी मंडळाच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली.दोन्ही मंडळातील कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी एक विचाराने दोन्ही यात्रांचा मध्य साधुन चैत्र शुध्द अष्टमीला भैरवनाथाची पालखी व चैत्र शुध्द द्वादशीला गोविंदगिरी महाराजांचा रथ काढायचा असा विचार मुक्रर केला त्याप्रमाणे आजपर्यंत गेली पंचेचाळीस वर्षे ही संयुक्त यात्रा उदंड उत्साहात भरत असते.नाथांची पालखी,रथ उत्सव या बरोबरच पुर्वी विविध खेळांचे सामने,कुस्त्या,बैलगाड्या शर्यती खिलारी जनावरांच्या भव्य प्रदर्शन व त्याला जोडुनच द्न्यानेश्वरीचे सामुदायीक पारायण अशी यात्रेची नेहमीची वैशिष्ट्ये आहेत.तर भैरवनाथ,गोविंदगिरी महाराज,संतशिरोमणी द्न्यानेश्वर यांच्या शिकवणुकीचा त्रिवेणी संगम हे यात्रेचे खास वैशिष्ट्ये आहे.यंदा दि.३० मार्च ते ०६ एप्रिल २०१८ अखेर ज्ञानेश्वरी सामुदायीक पारायण सोहळा संपन्न होत आहे.

प्रथमवर्षी अकरा हजार वारकऱ्यांनी एकाच वेळी द्न्यानेश्वरी ग्रंथाचे सामुदायीक पारायण केले होते.नंतर प्रतिवर्षी अकराशे वारकरी पारायणास बसतात.नामवंत किर्तनकारांचे किर्तन होते.पारायणाला बसलेल्या भक्तांना सर्वस्तरातल्या ग्रामस्थाकडून रोज चहा,नाष्टा व मिष्टान्न भोजन असते. सामाजिक एकात्मतेचे चित्र अन्यत्र पहायला मिळत नाही.म्हणुनच या यात्रेने कडेगाव नगरीचा सांस्कृतीक वारसा उंचावला आहे.असे मानावे लागेल. हे गोविंदगिरी महाराज कोण? त्यांच्या नावाने यात्रा सुरू करण्याचे प्रयोजन काय? या निर्माण होणाऱ्या प्रश्नाची पार्श्वभूमी मनोरंजक व उदबोधक आहे.कडेगाव नगरीतील वयोवृध्द ग्रामस्थाकडून समजलेली माहीती अशी की गोविंदगिरी महाराज हे अध्यात्मिक उंची गाठलेले थोर वाचासिध्दी प्राप्त झालेले संत सतपुरूष होते.त्यांनी अंदाजे सातशे वर्षापूर्वी कडेगावात जीवंत समाधी घेतली होती.त्यांचे महात्म्य एवढे मोठे होते की त्यांच्या हातुन ज्वारी टाकली तरी तिच्या लाह्या होत होत्या.गोविंदगिरी महाराज कडेगावचे मठाधिपती होते.गावातील एकचतुर्थांश जमीन त्यांच्या मालकीची होती.महाराजाकडे लांबच्या ठिकाणाहुन गिरी गोसावी साधु संत यांचे तांडे येत असत तांड्यात हत्ती घोडे उंट पालख्या असा मोठा लवाजमा असे त्यांचा महिनाभर कडेगाव नगरीत मुक्काम असायचा मानवतेचे कल्याण ईश्वराचे चिंतन याबाबत चर्चा चालायच्या सध्या कडेगाव डोंगराई रस्त्यालगत आठखांबी समाधीवर मंदिर बांधलेले आहे.गोविंदगिरी समाधी मंदिरा प्रमाणे आठखांबी रथ कडेगावातील ग्रामस्थांनी बनविला आहे.चैत्र शुध्द बारशीला या रथाची मिरवणुक निघते.गोविंदगिरी महाराज नवसाला पावतात अशी हजारो भाविकांची श्रध्दा आहे.नवसपुर्ती झालेले भाविक रथाला नारळ नोटा व देणग्या अर्पण करतात.दर सोमवारी व गुरूवारी परिसरातील भाविक श्रध्देने गोविंदगिरी महाराजांच्या समाधीवर माथा टेकतात.व मनोकामना मुकपणे व्यक्त करतात.

कडेगावात मध्यभागी भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे.मंदिर भव्य आकर्षक व प्रशस्त आहे.मंदिराचा कळस गगनस्पर्शी आहे.गावातील शिंदे सरकार भावकीतल्या लोकांनी तसेच भैरवनाथ गणेश मंडळातील तरूण कार्यकर्त्यांनी एकत्र येवून स्वखर्चाने व श्रमदानाने मंदिराचा जार्णोध्दार केलेला आहे. गाभाऱ्यातील फरशा भिंतीचे गिलावे व अंतरबाह्य रंगकाम पुर्ण झालेले आहे.पूर्वी भैरवनाथाच्या मुर्ती भंगल्या होत्या.माजी सरपंच ए.के शिंदेसरांनी ग्रामस्थाच्या मदतीने मंडपावरील पत्रा व नविन मुर्ती बसवण्याचे काम केले.कडेगाव नगरीचे भैरवनाथ हे प्रमुख ग्रामदैवत आहे. दि.२८ मार्च ते ०६ एप्रिल अखेर चालणाऱ्या यात्रेत भरगच्च कार्यक्रम आहेत.सध्या माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांचे व यात्रा समितीचे संस्थापक अध्यक्ष पाडुरंग डांगे बापु यांचे दु: खद निधन झाले आहे.त्यामुळे सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द केले आहेत.फक्त धार्मिक कार्यक्रमच होतील.गुरूवार दि. ०५/०४/२०१८ रोजी साय.४ वा.कडेगांव तालुक्यातील सर्व भजनी मंडळातर्फे दिंडी मिरवणुक सोहळा व शुक्रवार दि.६ /०४/ २०१८ रोजी महाप्रसाद व पारायण समाप्ती. पारायण कार्यक्रम ही भव्य असा आहे.शुक्रवार दि.३०/०३/२०१८ ते शुक्रवार दि.०६/०४/२०१८ असा आहे. दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५.३० ते ७ काकड आरती.पोथी वाचन स.८ ते दु.१२,भजन दु.२ते४ प्रवचन ५ ते ६.३० हरीपाठ साय.७ ते ८ किर्तन रात्री ९.३०ते १२. ह.भ.प.सोमनाथ वाघमारे सर खानापुर , वसंत ईनामदार,अभय भंडारी विटा,रेणुशे महाराज व विष्णु चव्हाण कराड तर किर्तन सेवा ह.भ.प.बजरंग महाराज घोटीलकर , अमोल महाराज सुळ मोरूची नातेपुते, युवा किर्तनकार शिवलीला महाराज बार्शी,ह.भ.प.मच्छिंद्र महाराज कावडे,गणेश महाराज डांगे ईत्यादी मान्यवरांच्या सुश्राव्य किर्तनाचा लाभ कडेगाव नगरीतील ग्रामस्थांना व भक्ताना मिळत आहे.रविवार दि.०८/०४/२०१८ रोजी पहाटे ५.३० वा.कडेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मुर्तीस महाभिषेक व काकड आरती सोहळा व सा.४ वा.भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणुक सोहळा होणार आहे.संयोजक श्री.भैरवनाथ गोविंदगीरी यात्रा मंडळ संतोष डांगे (चेअरमन) कडेगांव व धनंजय देशमुख भैय्या कडेगाव .