१ हजाराची लाच स्विकारणा-या अव्वल कारकूनास –  न्यायालयाने दिली ४ वर्ष सक्त मजूरीची शिक्षा

0
937
Google search engine
Google search engine

भोकर (नांदेड):-

स्वस्त धान्य दुकानातील धान्य गोदामातून उचलण्यासाठी परमिट देण्यास्तव उमरी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील लोकसेवक अव्वल कारकुन(पेशकार) शेख महमद अमीन बंदगी यांनी दुकानदाराकडून १ हजार रुपयाची लाच स्विकारल्याचे सिद्ध झाल्यावरुन भोकर अतिरीक्त जिल्हासत्र तथा विशेष न्यालयाचे तदर्थ जिल्हा न्यायाधिश मुजीब एस. शेख यानी दि.१० एप्रिल रोजी त्या अव्वल कारकूनास ४ वर्ष सक्त मजुरी व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असल्याने महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मौ.कुदळा ता.उमरी जि.नांदेड येथील स्वस्त धान्य दुकानदार किशन सटवाजी गायकवाड हे दुकानातील लाभार्थींसाठी स्वस्त धान्य उचलण्यासाठी उमरी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गेले असता या विभागाचे अव्वल कारकून तथा पेशकार शेख महंमद बंदगी यांनी ते धान्य गोदामातुन उचलण्यासाठी लागणारे परमिट देण्यास्तव किशन गायकवाड यांना १ हजार रुपये लाच द्यावी अशी मागणी केली.परंतू यावेळी किशन गायकवाड यांना त्या पेशकारास लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय नांदेड यांच्याकडे दि.२१ आॅगस्ट २०१० रोजी पेशकार शेख महंमद बंदगी यांच्या विरुद्ध रितसर तक्रार दाखल केली.तसेच ती रक्कम देण्याचे कबूल केले. यावेळी तत्कालीन पो.नि. विजयकुमार पन्हाळे यानी आपल्या सहकारी कर्मचा-यांच्या पथकासह दि.२३ आॅगस्ट २०१० रोजी तहसिल कार्यालय उमरी येथे साफळा रचून लोकसेवक अव्वल कारकून शेख महंमद बंदगी यांना १ हजार रुपयाची लाच स्विकारतांना पंचासमक्ष रंगेहात पकडले.तसेच शेख महंमद अमीन बंदगी यांनी पदाचा दुरुपयोग करुन कायदेशीर परिश्रमिका मिळत असतांना देखील भ्रष्ट मार्गाने आर्थीक लाभ घेतला व गुन्हा केला.यावरुन उमरी पोलीसांत गुरन.२६/२०१० कलम ७,१३(१)(ड) व १३ (२) नुसार लाच लुचपत तथा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कायद्या १९८८ प्रमाणे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.तसेच तत्कालीन नांदेड जिल्हाधिकारी यानी तपासकामी परवानगी दिल्यावरुन सखोल तपासाअंती पो.नि.विजयकुमार पन्हाळे यांनी भोकर अतिरीक्त जिल्हासत्र तथा विशेष न्यायालयात खटला क्र.०१/२०११ नुसार सदोष दोषारोपपत्र दाखल केले.