२२ विमा धारकांना पॉलिसीच्या बोगस पावत्या देऊन ९ लाख ४७ हजारांचा गंडा

0
624
Google search engine
Google search engine

२२ विमा धारकांना पॉलिसीपोटी भरलेल्या रकमेच्या बोगस पावत्या देऊन ९ लाख ४७ हजारांचा गंडा

बीड: नितीन ढाकणे: शहरातील २२ विमा धारकांना त्यांनी पॉलिसीपोटी भरलेल्या रकमेच्या बोगस पावत्या देऊन ९ लाख ४७ हजारांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून खाजगी विमा कंपनीच्या सेवा व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.बीड शहरात मागील दहा वर्षापासून आयसीआयसीआय प्रूडेंशीअल या विमा कंपनीचे कार्यालय आहे. येथील तत्कालीन विक्री व्यवस्थापक आशिष साहेबराव गिऱ्हे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार त्यांच्या कार्यालयात शशांक संतोष जोशी हा वरिष्ठ सेवा व्यवस्थापक पदावर कार्यरत होता. लोकांना पॉलिसी विकणे सेवा देणे हे काम त्याच्याकडे होते. दि. ४ जानेवारी २०१६ ते २२ जानेवारी २०१८ या दोन वर्षाच्या कालावधीत शशांक जोशी याने २२ विमा ग्राहकांकडून ‘मी तुमच्या पॉलिसी बँकेत भरतो आणि तुम्हाला पावती देतो’ असे म्हणून एकूण ९ लाख ४७ हजाराची रक्कम हडप केली आणि ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेच्या बनावट पावत्या बनवून दिल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शशांकने तीन महिन्यात संपूर्ण रक्कम आयसीआयसीआय प्रूडेंशीअलकडे भरणा करतो अशी लेखी कबुली दिली होती. परंतु, १८ मार्च २०१८ रोजी मुदत संपूनही त्याने भरणा केला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी आशिष गिऱ्हे यांच्या फिर्यादीवरून शशांक जोशी याच्यावर कलम ४२०, ४०९, ४६४, ४६७, ४६८, ४७१ अन्वये बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.