हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी स्वामी असीमानंदजी यांना गोवणाऱ्या काँग्रेसींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा ! – रमेश शिंदे – राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

0
1426

मुंबई – वर्ष 2007 मध्ये भाग्यनगर (हैदराबाद) येथील मक्का मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व 5 ‘हिंदू’ आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केल्याने हिंदु संत आणि हिंदुत्ववादी संघटना यांवर होत असलेले नाहक आरोप पुन्हा एकदा खोटे ठरले. हा निर्णय हिंदु समाजासाठी आनंददायी आहे. यापूर्वीही तत्कालीन काँग्रेस सरकारने मालेगाव बॉम्बस्फोट, मडगाव बॉम्बस्फोट आदी अनेक प्रकरणांमध्ये निष्पाप हिंदूंना अडकवून अस्तित्त्वात नसलेला ‘हिंदु आतंकवादा’चा बागुलबुवा निर्माण केला. स्वामी असीमानंदजी यांना या प्रकरणी न्यायालयाने दोषमुक्त केल्याने काँग्रेसने निर्माण केलेला ‘हिंदु आतंकवादा’चा बुरखा फाटला आहे. आता हिंदु आतंकवाद सिद्ध करण्यासाठी स्वामी असीमानंदजी यांना गोवणार्‍या काँग्रेसींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
हिंदु संतांना नाहक बदनाम करून ‘हिंदु दहशतवाद’ निर्माण केला जातो. ‘हिंदु दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी खोटे पुरावे गोळा केले जातात. याउलट अनेकदा सर्व पुराव्यांनिशी मुसलमान आतंकवादी सापडले, तरी त्याला कधी ‘हिरवा दहशतवाद’ वा ‘इस्लामी आतंकवाद’ असे म्हणण्याचे धाडस कोणी करत नाही. तेव्हा मात्र ‘आतंकवादाला धर्म नसतो !’, हा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चालवला जाणारा दुटप्पीपणा आहे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.
गुजरातच्या डांग जिल्ह्यातील आदिवासी हिंदूंचे धर्मांतर करण्यास तेथे कार्यरत असणारे स्वामी असीमानंदजी यांच्यामुळे ख्रिस्ती मिशनरींना अडथळा येत होता. त्यांचा काटा काढण्यासाठी मिशनरींनी काँग्रेसवर दबाब आणून स्वामी असीमानंदजी यांना या बॉम्बस्फोटाच्या कटात जाणीवपूर्वक गोवले. काँग्रेस शासनपुरस्कृत असलेल्या या कटाचाही आता शोध घ्यायला हवा. हिंदु संतांवर खोटे आरोप करणे आणि ‘हिंदु आतंकवादा’चा प्रचार करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे. मागील वर्षी अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणातूनही स्वामी असीमानंदजी यांची निर्दोष मुक्तता झाली. स्वामी असीमानंदजी यांच्या सुटकेचा आम्हाला आनंद आहेच; पण जेव्हा त्यांना या षड्यंत्रात जाणीवपूर्वक गोवणार्‍या संबंधित हिंदुद्रोह्यांना शिक्षा होईल, तेव्हा खर्‍या अर्थाने हिंदु समाजाला न्याय मिळाला, असे म्हणता येईल, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.