विहापुर येथे जमिनीच्या वादातून महिलेचा खून – दिराचे कृत्य >< कडेगाव पोलिसात फिर्याद दाखल

0
1317

हेमंत व्यास :- कडेगाव –

विहापुर (ता. कडेगाव ) येथे शेतजमिनीच्या वादातून वनिता जालिंदर भोंगे (वय ३५) या महिलेचा काल सोमवार (ता. १६ ) रोजी खून करण्यात आला. या घटनेत मयत महिलेचे पती जालिंदर महादेव भोगे (वय ४० ) हे जखमी झाले आहेत . घटनेतील संशयित आरोपी नारायण महादेव भोगे (वय ३६ ) यास अटक करण्यात आली आहे. सख्या दिराने भावजयीचा खून केल्याच्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की विहापुर येथील जालिंदर महादेव भोगे व त्यांचा भाऊ संशयीत आरोपी नारायण महादेव भोगे यांच्यात शेतजमिनीचा वाद होता .जालिंदर महादेव भोगे यांना तोंडाचा कर्करोग आहे . पत्नी वनिता व एक मुलगा अशा कुटुंबासह ते विहापुर येथे राहत होते .
दरम्यान, काल सोमवारी (ता. १६ ) रोजी रात्री ८;३० वाजता संशयित आरोपी नारायण महादेव भोगे हा दुचाकीवरून जालिंदर यांच्या घरासमोर आला .यावेळी नारायण याने जालिंदर यांना शिवीगाळ करून लाकडी दंडक्याने मारहाण केली . यावेळी मध्ये आलेल्या जालिंदर यांच्या पत्नी वनिता यांच्या डोक्यात संशयित आरोपी याने लाकडी दांडके जोराने मारले .यावेळी वनिता जागीच कोसळल्या . वनिता यांना उपचारासाठी कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला .
दरम्यान मयत वनिता यांचे जखमी पती जालिंदर महादेव भोगे वय -४० यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे . आरोपी नारायण भोगे यास पोलिसांनी अटक करून न्यालायात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २२ एप्रिल पर्यंत (सहा दिवसांची) पोलीस कोठडी सुनावली आहे .अधिक तपास पोलीस निरीक्षक के एस पुजारी करीत आहेत .