शानदार सोहळ्यात २२ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !

0
941
Google search engine
Google search engine

संत -महंत, मान्यवर व समाजबांधवांची  प्रचंड उपस्थिती

बीड, परळी वैजनाथ:  नितीन ढाकणे

ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ३९ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २० एप्रिल रोजी शानदार व  वैभवी स्वरूपात संपन्न झाला.शानदार सोहळ्यात २२ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती  लाभली.

गेल्या ३९ वर्षापासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी ११.२४ वा. हालगे गार्डन परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चार व विधीपुर्वक संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहर देव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले.  या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या २२ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. यावेळी प.पु.जगद्गुरू द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी,  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांचे अशिर्वचन झाले.यावेळी आद्य शंकराचार्य जयंती, धर्मपालन व  उपनयन संस्कारांचे महत्त्व त्यांनी यावेळी विशद केले. या सोहळ्याला राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे,  विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते ना. धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी, आजी माजी  लोकप्रतिनिधी, आदी उपस्थित होते.यावेळी ना.पंकजाताई मुंडे यांचे रितीरिवाजानुसार  सौभाग्य लेणे देउन  पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तर   पारंपरिक पद्धतीने स्वागत व  महाराष्ट्रीयन आॅफ दि इयर २०१८ पाॅवरफुल राजकारणी :प्रभावी नेता पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल ना.धनंजय मुंडे यांचा ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

या वेळी आशिर्वचन देतांना प.पु.जगद्गुरू द्वारा आचार्य अमृताश्रम स्वामी यांनी आद्य शंकराचार्य हे युगप्रवर्तक होते असे सांगून धर्माचरणाचे संस्कार हे उपनयनासारख्या संस्कारातून होते त्यामुळे आपले सोळा संस्कार हे धर्मसंमत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यात्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या या संस्कारांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते. देव, देश आणि धर्म पालनाचे संस्कार यातून रुजवले जातात. धार्मिकदृष्या तर अनन्यसाधारण महत्त्व असलेले हे संस्कार सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे ठरतात असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी यांनी यावेळी केले. ब्राह्मण समाजाचे उपक्रम व  कार्य हे माझ्या घरचे कार्य वाटते .त्यामुळेच मी कुठेही असलो तरी आवर्जून सामुदायिक उपनयन संस्कार सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहतो.सामाजिक संघटनासाठी असे सोहळे गरजेचे असल्याचे सांगून ब्राह्मण सभेच्या प्रत्येक कार्याला सदैव सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली. तर आपल्या परंपरा जपताना त्यातून सामाजिक ऐक्य व आत्मिक जिव्हाळा निर्माण होतो. आपण नेता म्हणून नव्हे तर आनंदाच्या मंगलप्रसंगी कुटुंबातील सदस्य या नात्याने उपस्थित झाल्याचे सांगून ब्राह्मण बहुद्देशीय सभेने विठ्ठल मंदिर जीर्णोद्धार व सभागृह उभारणीचे काम हाती घेतले असून या कामासाठी सर्वतोपरी मदत करू असे अश्वासन ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिले.

दोन दिवस हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आज सकाळी मातृकापुजनानंतर सर्व बटूंची हालगे गार्डन ते प्रभू वैद्यनाथ मंदिर अशी भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सनई चौघडा, मंत्रोच्चार व समाजबांधवांची प्रचंड उपस्थिती यामुळे परिसर दणाणून गेला होता. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रबोधिनी चे अध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी यावेळी ब्राह्मण सभेच्या उपक्रम व कार्याचा आढावा उपस्थितांसमोर प्रास्ताविकातून मांडला. उपस्थित संत महंत व मान्यवरांचे स्वागत ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने अध्यक्ष शरदराव कुलकर्णी, सचिव प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष वासुदेव पाठक आदी पदाधिकार्‍यांनी केले.

सूत्रसंचालन प्रशांत प्र. जोशी, प्रा. रविंद्र जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र नव्हाडे यांनी केले.  या सोहळ्याच्या  यशस्वीतेसाठी ब्राह्मण बहुद्देशीय सभा, स्वा.वी. दा.सावरकर प्रबोधिनी,पेशवा युवा संघटन, ब्राह्मण महिला आघाडी, ब्राह्मण युवक संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.