अंबाजोगाई परिसरातून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

0
914

त्यापैकी तिघांना पाठलाग करून पकडण्यात पोलिसांना यश आले

बीड :नितीन ढाकणे

अंबाजोगाई : जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अंबाजोगाई अपर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकांनी संयुक्त कारवाई करत अंबाजोगाई – पोखरी रोडलगतच्या एका गोदामाच्या पाठीमागे छापा मारून दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना जेरबंद केले तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

दि. १९ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील कर्मचारी अन्य गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या शोधात अंबाजोगाई शहरात आले होते. रात्रीच्या सुमारास ते अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकासोबत गस्त घालत होते. यावेळी अंबाजोगाई – पोखरी रस्त्यालगतच्या एका गोदामाच्या पाठीमागे पाच चोरटे शस्त्रांसहित दबा धरून बसले असून ते अंबाजोगाई शहरात कुठे तरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकास मिळाली. माहितीची खातरजमा झाल्यानंतर दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई करत रात्री ११ वाजताच्या सुमारास सदरील गोदामाच्या पाठीमागे छापा मारला असता तिथे पाच चोरटे आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापैकी तिघांना पाठलाग करून पकडण्यात पोलिसांना यश आले तर अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. पकडण्यात आलेल्यात रामकृष्ण बबन जाधव (रा. पिटी, ता.पाटोदा), बबन लक्ष्मण गायकवाड (रा.औरंगपुर, ता. शिरुर) आणि शाहेद जाफर सय्यद (रा. राजुरी, ता. बीड) या तिघांचा समावेश आहे. त्यांच्याजवळून लोखंडी गज, मिरची पावडर आदी दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. फरार झालेल्या दोघांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. सर्व आरोपींवर कलम ३९९, ४०२ अन्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे आणि सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सहा. पोलीस निरीक्षक धस, पोलीस कर्मचारी विठ्ठल देशमुख, चव्हाण, पवार, भास्कर केंद्रे, नागरगोजे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. दरोडेखोरांची टोळी पकडून संभाव्य दरोडा रोखल्याबद्दल पोलीस दलाचे कौतुक होत आहे.