जलसंवर्धनासाठी नागपूर येथील डॉक्टरांचे नरखेड तालुक्यात श्रमदान – सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत शेमडा गावांमध्ये ८० डॉक्टरांनी केले श्रमदान

0
911
Google search engine
Google search engine

वाटर कप स्पर्धा : विविध स्तरांवरील डॉक्टरांचा व समाजसेवकांचाही पुढाकार !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय श्रमदानात सहभागी !

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी :-

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत नरखेड तालुक्याच्या ६५ गावांचा सहभाग आहे. यातील काही गावांत उत्साहात कामे होत आहे. या जलसंवर्धन प्रक्रियेत डॉक्टरही मागे नाहीत. गावांत डॉक्टरांसह व्यावसायिक, नोकरदार, संस्थांचे कार्यकर्ते आदींचे हात श्रम करताना दिसत आहेत. एरवी एसीमध्ये राहणारे डॉक्टर ४५ अंशांच्या तप्त उन्हात श्रमदान करताना तसेच उच्चभू्र व सुशिक्षित मान्यवरांची ही श्रूखंला ग्रामस्थांचा उत्साह वाढवित आहे.

डॉक्टर्स म्हटले की सरकारी वा खासगी रुग्णालय, रुग्णांची तपासणी, वातानुकुलीत कॅबीन, गळ्यात टेटॅस्कोप, इंजेक्शन असे काहीसे चित्र डोळ्यासमोर येते; पण यापेक्षा वेगळेच वास्तव गावोगावी अनुभवास येत आहे. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावांत जलसंवर्धनाची चळवळच उभी होत आहे. स्पर्धा असली तरी काही गावांत या स्पर्धेला चळवळीचेच स्वरूप आले आहे. गावातील बहुतांश हात या कार्यात गुंतले आहे. ग्रामस्थ स्वत:ला झोकून देत बंधारे, समतल चर, कंटूर बंडींग, दगडी, मातीचे बांध आदी कामांसाठी दिवसरात्र कुदळ, फावड्यांत व्यस्त होत असल्याचे दिसते. या कार्यात नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील ८० डॉक्टर विद्यार्थ्यांनी नरखेड तालुक्यातील शेमडा या गावामध्ये जाऊन भर उन्हात श्रमदान केले .

नरखेड तालुक्यामध्ये डॉक्टरांसह व्यावसायिक, नोकरदार, समाजसेवक, विद्यार्थी, विविध संस्थांचे कार्यकर्ते आदींचा उत्साह वाखाणण्याजोगा ठरत आहे. काही डॉक्टरांनी या कामात वाहूनच घेतल्याचे दिसते. पाण्याचे महत्त्व जाणून घेत ४५ अंशांवर पारा असताना डॉक्टरांसह शहरातील एसीच्या गारव्यातून बाहेर पडत श्रमदान करणारे हात पाहून ग्रामस्थ जोमाने श्रमदान करताना दिसतात. अनेक जण तर माझा तालुका, माझे गाव, माझा जिल्हा यात सुरू असलेल्या या उपक्रमात माझा सहभाग असावा, या भावनेतून १०० ते २०० किमीचे अंतर कापून श्रमदानाकरिता गावांत येत आहे. अनेक वर्षांपासून दुरावा निर्माण झाला असला तरी वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने गावाची भावनिक ओढ स्वस्थ न बसू देणारीच ठरत आहे.

तरुण, तरुणी असो की ज्येष्ठ नागरिक सामाजिक जाणीवेने झपाटलेल्या व्यक्ती श्रमदानाकरिता वेळ काढून गावांत येत आहे. काही तास श्रमदान करून गावी परतताना त्यांच्या चेहऱ्यांवर कामाचे समाधानही दिसते. शहरातून गावाकडे वळणारी ही पावले ‘खेड्यांकडे चला’ हा संदेश पुन्हा देत असल्याचेच दिसते. यावेळी श्रमदान करतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पशु वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील डॉ आशुतोष जाधव , डॉ पंकज सतनकर , डॉ हरीश ठाकरे , डॉ संतोष वडोकर , डी प्रदीप शिंपले , यांच्यासह डॉक्टर मंडळी, विद्यार्थी पाणी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , अतुल तायडे , शिव टेके , अनिल वाघ , बबिता गडलिंग , दयाल भादे , यांच्यासह गावकरी युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती .