*अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो – राजन खान >< आम्ही सारे फाउंडेशनद्वारा आयोजित व्याख्यानात प्रतिपादन*

0
1432
Google search engine
Google search engine

*अमरावती:- (शहेजाद खान)*

अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो. मायेचा, करुणेचा, आपुलकीचा इतरांसाठी येणारा डोळ्यातला कणवाळू थेंब म्हणजे प्रेम असतं. आपण आपल्यावरीच नेहमी प्रेम करतो. ते इतरांवरतीही करता आलं पाहिजे. कुणाकरितातरी आपले डोळे निरपेक्ष भरून आले पाहिजेत. असं प्रतिपादन डॉ. राजन खान यांनी केले. आम्ही सारे फाउंडेशनद्वारा आयोजित ‘‘प्रेम म्हणजे नेमकं काय असतं?’’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. स्थानिक विमलाबाई सभागृहात शनिवारी सायंकाळी हे व्याख्यान झाले. यावेळी विचारपीठावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्यामल सराडकर व श्रोत्यांमध्ये आ. रविकांत तुपकर, मनपा आयुक्त हेमंत पवार, डॉ. नितीन व्यवहारे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. मोहना कुळकर्णी, डॉ. हेमंत खडके, मीडिया वॉचचे संपादक तथा ‘‘आम्ही सारे’’चे अध्यक्ष अविनाश दुधे, हरिभाऊ मोहोड, विजय विल्हेकर व मान्यवर उपस्थित होते.
विषयाला हात घालताना डॉ. राजन खान यांनी त्यांच्या अनुभवातील बारकावे प्रेम या विषयाच्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अशी खंत व्यक्त केली की प्रेम हा अत्यंत सार्वजनिक व सार्वत्रिक विषय असूनदेखील यावर आपल्या देशात मोकळेपणानं बोललं जात नाही. प्रेम ही जगण्यातील नित्य बाब आहे. मात्र इथल्या स्त्री-पुरूष भेदामुळे इथे मुलींना अभिव्यक्त होण्याची संधी मिळत नाही. इथली संस्कृती ही पितृसत्ताक नसून पुरुषसत्ताक आहे. मृत्यूच्या भीतीतून माणसाने सगळी नाती निर्माण केली. आदानप्रदानाच्या खेळालाच अलीकडे प्रेम म्हटले जाऊ लागले आहे. प्रेम ही व्यक्त करण्याची गोष्ट नाही. ती आपल्या वागण्यातून, आपल्या व्यवहारातून आपोआप व्यक्त व्हायला पाहिजे किंवा होत असतं. आपल्याला आयुष्यभर सेकंदासेकंदाला प्रेम होऊ शकतं. मात्र खरं प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होत असतं. प्रेमभंगाची अथवा घटस्फोटांच्या घटना वारंवार होत आहेत. त्या वाढत चालल्या आहेत. या पृथ्वीवर अनौरस कुणीच नाही. विवाहवगैरेच्या वेळी जे लोक पत्रिका पाहतात ते प्रेम करणारे नसतात. प्रेमात कोणताच निकष लावला जाऊ शकत नाही. अलीकडे माध्यमांतून गोरं असणं आणि सुंदर असणं याचा व्यावसायिक लाभाकरिता प्रचार केला जातो. आपल्या डोळ्यासमोर उभी असलेली व्यक्ती ही पहिल्याच भेटीत आवडली तर आपलं त्या व्यक्तीवर प्रेम जडू शकतं. जागतिक साहित्याने स्त्रीयांच्या सौंदर्यांला अनेक विषयांच्या उपमा देऊन त्यांचा अपमान केला आहे. आयुष्यभर कुणा एकावर निष्ठेन प्रेम करता आलं पाहिजे. करुणा हे माणसाने शोधलेलं मूल्य आहे. जगातला प्रत्येक माणूसाला प्रेम करता येतं. आपण ते करत नाही. ते आवर्जूून केलं पाहिजे. असंही राजन खान यावेळी म्हणालेत.

कार्यक्रमाचे अतिथी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्यामल सराडकर यांनी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रेम या विषयाची मांडणी केली. ते म्हणाले की समान अभिरुची किंवा समान सुख-दुःख असलेल्यांमध्ये लवकर मैत्री होते. प्रेम हा माणुसकीचा संदेश आहे. यात माणूस महत्त्वाचा असतो. कला व विज्ञान यांचा संगम म्हणजे प्रेम असतं. प्रेम कुणीही करू शकतो. प्रेम हे चित्रातील अॅबस्ट्रॅक्ट शोधण्यासारखं दिव्य काम आहे. कधी कधी शोषणाचा रस्ता हा प्रेमातूनच जातो. माणूस हा स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करतो. प्रेमाला आपल्या मेंदूने व मनाने जन्म घातला आहे. एकटेपणाची भीतीदेखील प्रेमाला जन्म देण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आपण आईच्या गर्भात असताना जी सुव्यवस्था असायची, जन्मानंतर तीच आपण व्यावहारिक जगात शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. प्रेमाची पहिली पायरी म्हणजे आपल्याला आई होता आलं पाहिजे. इतरांची वेदना कळली पाहिजे. त्यासाठी आपल्याला माती होता आलं पाहिजे. प्रेमाचा संबंध आपण भौतिकतेशी जोडतो. खरे पाहता एकमेकांच्या सुख-दुःखांना समजून घेणं म्हणजे प्रेम असतं. प्रेम ही म्हातारपणातील आधाराची काठी होते एकदुसऱ्यांची. यावेळी डॉ. श्यामल सराडकर यांनी अनेक वैद्यकीय व मानसशास्त्रीय संकल्पनांवरदेखील श्रौत्यांशी चर्चा केली. आपल्या प्रास्ताविकात अतुल विडुळकर यांनी ‘‘प्रेम’’ हा विषय निवडण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ओशोपासून अनेकांचे दाखले देत विडुळकर यांनी विषयाचा परियच करून दिला. आम्ही सारे फॉउंडेशनच्या कार्याची माहितीदेखील त्यांनी आपल्या लघू प्रास्ताविकातून दिली. भरगच्च सभागृह व सभागृहाबाहेर श्रोत्यांची गर्दी हे या कार्यक्रमाचे विशेष यश राहिले.