शंकराचार्य श्री.विद्यानृसिंह स्वामींच्या हस्ते श्रीराम मंदीराचे कळस रोहण व मूर्ती स्थापना सोहळा संपन्न

0
1291
Google search engine
Google search engine

अकोट- संतोष विणके :-

ज्या प्रमाणे कळसाशिवाय मंदीराला पूर्णत्व येत नाही ; त्याच प्रमाणे ” भगवत प्राप्ती ” शिवाय आयुष्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही.त्यासाठी प्रत्येक मनुष्याने भक्ती ,कर्म व ज्ञानाचा मार्ग स्विकारावा,असा हितोपदेश करवीपीठाचे शंकराचार्य जगतगुरु प.पु.श्री.विद्यानृसिंह स्वामी महाराज यांनी केला.

स्थानिक शनिवार पुरा येथे रविवार (ता.२२) ला सकाळी,श्रीराम मंदीराचे कळस रोहण व जिर्णोध्दारानंतरील मंदीरातील देवतांची स्थापना शंकराचार्यांच्या हस्ते संपन्न झाला. भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन करतांना त्यांनी उपरोक्त हितोपदेश केला.या सोहळ्याचे आयोजन श्रीराम मंदीराचे विश्वस्त मंडळ व जिर्णोध्दार समितीने केले होते.त्या प्रसंगी बोलतांना शंकराचार्य पूढे म्हणाले की,गंगेला सागराशिवाय,स्त्रीला मातृत्वाशिवाय,दागिन्यांना नथीशिवाय,पंगतीच्या जेवणाला तूपाशिवाय,पेहरावाला टोपीशिवाय पुर्णत्व प्राप्त होत नाही.देवाला सुध्दा आई म्हणून घेणं आवडतं म्हणून आपण विठोबाला ” विठाई ” म्हणतो,असे त्यांनी स्पष्ट केले.ते पूढे म्हणाले की, कळस रोहणासाठी शंकराचार्यांनाच इतक्या लांबून करवीरपीठावरुन का बोलावले तर त्याचे कारण असे आहे की,मंदीरातील देवता सगुण आहेत तर कळस निर्गूण आहे.निर्गूणाचा उपासक संपूर्ण संन्यासीच कळस रोहण करु शकतो.आयुष्याची पूर्णावस्था संन्यासाश्रम आहे.समतुल्यत्व साधण्यासाठी संन्यासीच लागतो.त्याशिवाय कळसापासून जमीनीपर्यंत जे पांढरे वस्त्र सोडले आहे म्हणजे आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर श्वेत म्हणजे स्वच्छ मार्गाने जावे लागेल व त्यासाठी सगुणाची मदत घ्यावी लागेल.ते पूढे म्हणाले की,आपण श्रीराम मंदीरात प्रभू श्रीरामाची भक्ती करतो, त्यामुळे आपणास त्यांच्या कुलपुरुषाची सुध्दा माहीती हवी.श्रीरामांनी त्यांचे कुलपुरुष सुर्यदेवतेच्या कुळाच्या सर्व मर्यादा पाळल्या.त्यांनी रामायणाची व्याख्याही सांगितली.ते म्हणाले की,ज्या प्रमाणे सुर्य उत्तरायण -दक्षिणायन करतांना दिशा बदलत नाही ; त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी दक्षिणेत रावणावर विजय संपादन करतांना दिशा न बदलता उत्तरेकडून दक्षिणेकडे व परत उत्तरेकडे प्रवास केला.त्या उत्तरायण व दक्षिणायनाप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला ” रामायण ” म्हटले जाते,असे ते म्हणाले.या मार्गदर्शनादरम्यान भाविकांना शंकराचार्यांकडून अनेक सखोल पौराणिक संदर्भ ऐकायला मिळाले.श्रीराम मंदीरात शंकराचार्यांच्या उपस्थित देवतांच्या मूर्ती व भाविकांमध्ये आंतरपाट धरल्या जाऊन मंगलाष्टकांचा अभिनव सोहळा संपन्न झाला.ही मंगलाष्टके श्रीराम गदाधर शास्त्री व बंडू महाराज जोशी यांनी म्हटली.हा सोहळा वाद्यवृंदाच्या गजरात व आतिशबाजीने संपन्न झाला.त्याकाळात झालेल्या होमहवनात भाविकांनी पूर्णहूती दिली.

प.पु.शंकराचार्यांचे मंदीरात आगमन झाले तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.त्यांचा व्यासपिठावर मंदीराचे अध्यक्ष मुकूंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुख्य उत्सवानंतर त्यांनी प्रस्थान केले.

त्यानंतर मंदीरात अंजनगांव सुर्जीतील देवनाथ मठाचे प.पु.श्री.जितेंद्रनाथ महाराजांचे आगमन झाले.त्यांचे पुष्पवर्षावाने स्वागत करण्यात आले.त्यांच्या आशिर्वचनाच्या प्रारंभी ” श्रीराम जय राम जय जय राम ! ” जपाचे नामसंकिर्तन करण्यात आले.महाराजांचा विश्वस्त अजय देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी बोलतांना महाराज म्हणाले की श्रीराम मंदीराच्या विश्वस्तांनी मंदीराचा जिर्णोध्दार ,कळस रोहण व श्रींच्या मुर्तींची स्थापना करुन मंदीराला गतवैभव प्राप्त करुन दिले.प्रभू श्रीराम हे धर्माचे चालते – बोलते स्वरुप आहे.शहराच्या टोकावर राहणाऱ्या रामभक्तांची चिंता या श्रीराम मंदीरातून झाली पाहिजे,असे ते म्हणाले.

त्यानंतर शेंदूर्जना बाजारचे प.पु.सचिन देव महाराजांनीही समयोचित मार्गदर्शन केले.व्यासपिठावर तेल्हा-याचे प.पु.आप्पा महाराज देव,अकोल्याचे श्रीराम गदाधर शास्त्री प्रामुख्याने उपस्थित होते.या सोहळ्याचे सुत्रसंचालन पत्रकार दिपक देव यांनी केले.त्यावेळी मंदीराचे अध्यक्ष मुकूंद जोशी,रविंद्र धोतरकर ,अँड.किशोर देशपांडे,सुधिर महाजन,अजय देशमुख,शशांक पाटील,पदमाकर महाजन,मोहन जती,वामन जकाते,सौ.यामीनी पाटील,संदीप जोशी आदी विश्वस्त मंडळ व जिर्णोध्दार समितीच्या सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम केले.तर सर्वश्री संजय बोरोडे,मोहन केदार,मोहन बोरोडे,सुरेश कतोरे यांच्यासह स्थानिक शनिवार पुरा व मोठी मढीतील समस्त नागरिकांनी हा उत्सव यशस्वी केला.महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.

शासनाचे अभिनंदन-प.पु.श्री.जितेंद्रनाथ महाराज

देश टिकला तर देव आणि धर्म टिकेल.शासनाने मुलींवर अत्याचार करणाऱ्यांसाठी आता फाशीच्या शिक्षेची तरतूद अध्यादेश काढून केली आहे.शासनाचे अभिनंदन ! प्रत्येकाने रावणाला ओळखून त्याचा नाश करावा म्हणजे ती ख-या अर्थाने रामभक्ती होईल,असे म्हणून प.पु.श्री.जितेंद्रनाथ महाराजांनी शासनाचे अभिनंदन केले.