राष्ट्रीय ई – पंचायत पुरस्काराने झाला ग्रामविकास विभागाचा गौरव 

0
752
Google search engine
Google search engine

ना.पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे नांव पुन्हा एकदा देशात झळकावले 

राष्ट्रीय ई – पंचायत पुरस्काराने झाला ग्रामविकास विभागाचा गौरव 

पंतप्रधानांच्या हस्ते ना. पंकजाताई मुंडेंनी स्विकारला जबलपूरमध्ये पुरस्कार

प्रतिनिधी : दिपक गित्ते 

जबलपूर ( म. प्र. ) दि. २४ – आपल्या कर्तृत्व आणि कामगिरीने राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्राचे नांव पुन्हा एकदा देशांत झळकावले आहे. ग्रामपंचायतीना सशक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाला जाहीर केलेल्या राष्ट्रीय ई – पंचायत पुरस्काराचे आज मंडला (जबलपूर, मध्य प्रदेश) येथे थाटात वितरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रामविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज मंडला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ई – पंचायत पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले. मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री रूपाला तसेच जिल्हयातील खासदार व आमदार आदी यावेळी उपस्थित होते.

पंचायत राज मंत्रालयाच्या वतीने डिजीटल इंडिया अंतर्गत हे पुरस्कार यंदा जाहीर झाले होते. केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल कांही राज्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रथम श्रेणीतील पहिला पुरस्कार सिक्कीम राज्याला, दुसरा ओरिसाला तर तृतीय पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला होता. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास विभागाने चांगली कामगिरी करत शासनाच्या विविध योजना महाराष्ट्राच्या ग्रामीण लोकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्टरित्या वापर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजाताई मुंडे यांचे यावेळी आपल्या भाषणात खास कौतुक केले. खेड्याचा विकास करून ग्रामपंचायती सशक्त करण्यासाठी केंद्र सरकार नेहमी तुमच्या सोबत आहे असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी उपस्थित ग्रामीण जनतेला यावेळी दिला.

महाराष्ट्र, पुन्हा एकदा देशात झळकला

राष्ट्रीय ई – पंचायत पुरस्काराने महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा देशांत उंचावली आहे. ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण जनतेच्या कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती, त्यासाठी संबंधित अधिका-यांच्या वेळोवेळी बैठका घेवून त्यांना मार्गदर्शन केले होते. या अगोदर दोन वर्षापूर्वी म्हणजे सन २०१५ – १६ मध्ये ग्रामविकास विभागाला पंचायत राज संस्थांना प्रदान केलेल्या अधिकाराचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर द्वितीय पुरस्कार देवून गौरविले होते. ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे आता पुन्हा एकदा या पुरस्काराने ग्रामविकास विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.