तितर-बटेरची वाहतुक करतांना पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना अटक

650
चांदूर रेल्वे वनविभागाची देवगांव-तळेगाव मार्गावर कारवाई
तर एकाला देवगांव फाट्यावर विक्री करतांना पकडले
३६ तितर, २ बटेर, २ ससे व २ वाहने जप्त
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान)
      चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या देवगाव फाटा व देवगाव-तळेगाव मार्गावर वनविभागाचे अधिकारी यांनी कार्स संघटनेच्या मदतीने कारवाई करून तितर, बटेर, ससे, वाहने जप्त करून एका पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांना अटक केल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली.
प्राप्तमाहितीनुसार, मारूती सुझुकी गाडी क्र. एमएच ३४ बीएफ २८९८ मध्ये २ तितर व स्कॉर्पीओ गाडी क्र. एमएच ३२ एएच १६५० मध्ये २ बटेर पक्ष्यांची वाहतुक करीत असल्याची माहिती चांदूर रेल्वे वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे देवगांव-तळेगाव मार्गादरम्यान दोन्ही वाहनांना पकडण्यात वनविभागाला यश आले. या गाड्यांमधून २ तितर, २ बटेर व दोन्ही वाहने जप्त करून आरोपी विक्की किशोर मानवटकर (३०) रा. अकोला , प्रविण गुणवंत चिकटवार (४५) व अजय काशीनाथ रीठे रा. हिंगणघाट यांना अटक करण्यात आली. यामधील अजय रीठे हा युवक पोलीस कर्मचारी म्हणुन कार्यरत आहे. यानंतर देवगांव फाटा येथून तितर, बटेर, ससे विक्री करणारा आरोपी पतीराम काळे याला पकडून त्याच्याजवळून ३४ तितर, २ बटेर, २ ससे जप्त करण्यात आले. या कारवाईत एकुण चार आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून ३६ तितर, २ बटेर, २ ससे व २ वाहने जप्त करण्यात आले. अटक आरोपींविरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९, ४८ (अ), ४९ अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास उपवनसंरक्षक हेमंत मीना, सहाय्यक वनसंरक्षक अशोक कविटकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आ. अ. कोकाटे करीत आहे.
         सदर कारवाईमध्ये चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आ. अ. कोकाटे, वनपाल डी. एच. वाळके, एम. के. निर्मळ, वनपरिक्षेत्रातील कु. फळ, कु. शेंडे, कु. तिवारी, कु. रेखे, श्री. डोंगरे, श्री. नाईक, श्री. वानखडे, श्री. हिवराळे, श्री. पवार, वनरक्षक, वनमजुर यांच्यासह कार्स संघटनेचे चेतन भारती, आकाश रामटेके, अक्षय तांबटकर, ऋषीकेश देशमुख आदींना सहभाग होता.
जाहिरात