चांदूर रेल्वेत भरदुपारी लागली दोन घरांना आग – अंदाजे एका लाखाचे नुकसान

0
649
Google search engine
Google search engine

(फोटो /News शहेजाद खान) 

        चांदूर रेल्वे शहरात भरदुपारी लागलेल्या आगीमुळे दोघांच्या घराचे अंदाजे एका लाखाचे नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली.

        प्राप्तमाहितीनुसार, शहरातील प्रभाग क्रमांक १ खडकपुरा येथील राहिवासी लक्ष्मण शिवचरण काळे (६५) व संजय पुंडलीक गोखे (४६) यांच्या घराला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये दरवाजे, घरातील साठवलेल्या धान्यासह सर्व साहित्य जळून खाक झाले. दोघांचेही घर कवलाचे व टिनाचे आहे. त्यापैकी संजय गोखे यांनी आपल्या घरामागे असलेल्या खुल्या जागेत तुराट्या, गुरांचा चारा साठवून ठेवला होता. ते सुध्दा आगीत भस्म झाले. या आगीत एकुण अंदाजे एका लाखाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची वार्ता समजताच खडकपुरा व माळीपुरा येथील युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वप्रथम दोन्ही घरातील सिलेंडर बाहेर काढले. त्यानंतर नागरीकांनी घरातील पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महिलांनी सुध्दा आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले असता चांदूर रेल्वे नगर परीषदच्या अग्नीशमन दलाच्या चमुंनी आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही घरांच्या मागील बाजुने एक मोठा नाला असून या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात याच परिसरातील एका नागरिकाने खत ठेवले होते. या खतावरील कचरा जाळण्यासाठी आग लावल्यानंतर याकडे दुर्लक्ष केले व तीच आग पसरत या दोन्ही घरांना लागल्याची प्राथमिक माहिती दिली. त्यामुळे एका नागरिकाच्या हलगर्जीपणामुळे ऐवढे मोठे नुकसान झाल्याचा आरोप लावण्यात येत आहे. परंतु पोलीसांच्या चौकशीनंतरच आगीचे कारण स्पष्ट होणार आहे.