बौद्धिक चौकटी तयार करा ; पण आई-वडिलांचे संस्कार आणि समाजाचा विचार विसरू नका

0
1346
Google search engine
Google search engine

बीड जिल्हयातील युपीएससी टॉपर्सचा पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार

बीड:- नितीन एस ढाकणे

दि. ०१:- बीड जिल्ह्यातील तरुणांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. येणाऱ्या काळामध्ये या अधिकाऱ्यांना विविध प्रकारच्या घटना आणि प्रसंगांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे सदसद्विवेकबुद्धीने अधिकारी म्हणून कार्य करीत असतांना बौद्धिक चौकटी तयार करा पण आई-वडिलांचे संस्कार आणि समाजाचा विचार विसरू नका. असे केल्यास कुठेही अडचणी येणार नाहीत आणि यशस्वीपणे तुम्ही कार्य कराल असा कानमंत्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.  पंकजाताई मुंडे यांनी दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलेल्या जिल्हयातील भूमीपुत्रांचा आज राजस्थानी सकल समाजाच्या वतीने राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शहरातील एल.डी.सी.  एक्झिक्यूटिव्ह हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास आ. आर. टी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमोल येडगे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संतोष हांगे, सर्जेराव तांदळे, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सलीम जहांगीर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे म्हणाल्या, मुंडे साहेबांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये विविध पदांवर कार्य केले. सर्व राजकीय पदांचा वापर त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी केला. मिळेल त्या पदाची जबाबदारी आणि जिल्ह्याचा विकास कसा करता येईल असेच बेरजेचे राजकारण साहेबांनी केले. त्यांच्याच शिकवणीमधून आम्ही घडलो आहोत यामुळे बीड जिल्ह्यात समाजकारणातून विकासाकडे घेऊन जाण्याच्या पायंडा वारसा पुढे चालवला आहे. अधिकारी, पदाधिकारी, नागरिक प्रत्येकाने स्वतःच्या कामातून जिल्ह्यासाठी काय चांगले करता येईल हे केले पाहिजे आणि जिल्ह्याची ओळख कशी चांगली होईल यासाठी प्रयत्नशील असले पाहिजेत असेही त्या म्हणाल्या.

सध्या बीड जिल्ह्याची ओळख बदलली जात असून ऊससोड कामगारांचा जिल्हा म्हणून नव्हे तर गुणवंतांचा जिल्हा म्हणून तसेच मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा जिल्हा म्हणून ओळख होत आहे. याच जोडीला विकासात्मक कामांना मिळत असलेली गती आणि दर्जेदार कामांमुळे जिल्ह्याचा कायापालट होत आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे गरजेचे आहे असेही पालकमंत्री मुंडे म्हणाले.

मी भाग्यशाली

माझ्या मुलाची परीक्षा कालपासून सुरू झाली आहे तो दहावीला आहे. तो आय.बी. बोर्डात शिक्षण घेत असल्यामुळे मला म्हणाला माझ्या परीक्षा होईपर्यंत कुठे जाऊ नका. परंतु मी माझ्या पदाचे कर्तव्य पाहता बीड जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी उपस्थित झाले आहे. आमच्या घरांमध्ये माझी छोटी बहीण प्रितम एम.डी.डॉक्टर असून खासदार आहे यशश्री ने एल.एल.बी. शिक्षण पूर्ण करुन विदेशात एलएलएम डिग्री मिळवली आहे तसेच माझे मिस्टर उच्चशिक्षित आहे.  मी डाॅक्टर किंवा वकील नसले तरी आई-वडिलांचे संस्कार आणि कुटुंबातील सर्वांचे सहकार्य यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजते.

 

करिअर गाईडन्सची कमतरता

बीड जिल्ह्यात मोठे टॅलेंट आहे, परंतु करीअर गाईडन्सची कमतरता आहे, त्यासाठीच आता येणाऱ्या काळात टॉपर्सची संख्या वाढली पाहिजे. यासाठी बीड शहरातील मंडळींनी करीअर गायडन्स करणाऱ्या संस्था आता सुरू केल्या पाहिजेत. परळीत गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही परळीत स्पर्धा परीक्षा अकॅडमी सुरू केली आहे. याच धर्तीवर बीडमध्येही सुरू करता येईल, असे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले. यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी युपीएससी टाॅपर प्रवीण नहार, रोहीत गुट्टे, प्रदीप सोनवणे, जयंत मंकले यांचा सन्मान केला.

७५ टक्के अंधत्व तरीही यशस्वी

मला ७५ टक्के अंधत्व आले आहे. मदत मागण्यापेक्षा आपण कोणाचेतरी आधार बनले पाहिजेत या इच्छाशक्तीवर युपीएसी परिक्षेतमध्ये यश मिळवले. अंधत्वाने मी खचलो नाही. जिद्दीने कामाला लागलो. अभ्यास केला. कठिण परीश्रम घेऊन परीक्षेत यश मिळविले. यासाठी मला माझ्या गुरूजनांनी केलेले सहकार्य बहुमोल आहे, असेही मत जयंत मंकले यांनी व्यक्त केले.

तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दोन वेळा दोन वेळा पास  झालो नाही परंतु तिसर्‍या परीक्षेमध्ये यश मिळवले. विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी आणि खूप परिश्रम घेण्याची ठरवल्यास कुठल्याही क्षेत्रांमध्ये अपयश येणार नाही हे लक्षात ठेवावे असे मत प्रणव नहार यांनी व्यक्त केले.

पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा गौरव

      मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकारांचा या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यात दैनिक सुराज्य चे संपादक सर्वोत्तम गावस्कर, दैनिक चंपावतीचे उपसंपादक दगडू पुरी, दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार रवी उबाळे त्यांचा गौरव करण्यात आला.

पीक विमा पारितोषिक मिळाल्याबद्दल ना. पंकजाताई मुंडेंचा सत्कार

पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्यामुळे जिल्हा सत्तेच्या माध्यमातून प्रगतीकडे वाटचाल करत आहे. त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे पीक विमा योजना अंमलबजावणीत बीडला देशात प्रथम क्रमांक मिळाला याबद्दल राजस्थानी समाजाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप लोढा यांनी केले तर आभार पारस ललवाणी यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व ज्ञानेश्वर काशीद यांनी केले. या कार्यक्रमास व्यापारी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार तसेच सकल राजस्थानी समाजातील युवक-युवती,महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.