अपघातानंतरही प्रवाशांच्या जिवाशी खेळत सुरू आहे अवैध वाहतुक – चांदूर रेल्वे व अमरावती पोलीसांचे दुर्लक्ष

0
695
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     गेल्या काही दिवसांपासून चांदूर रेल्वे शहरातून मोठ्या संख्येने अवैध प्रवासी वाहतूक बोकाळले असुन चांदूर रेल्वे व अमरावतीचे वाहतूक पोलिस नेमके करतात तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे.
       चांदूर रेल्वे शहरातून अमरावती येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुक केली जाते. अवैध प्रवासी वाहतूक करत असताना वाहनधारक पैसा मिळविण्याच्या हेतूने आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरत असतो. एका व्हॅनमध्ये जवळपास १५ प्रवाशी किंवा कधी कधी तर त्यापेक्षाही जास्त कोंबून भरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या जिवाशी खेळत भरधाव वेगाने वाहनसुध्दा चालवित असल्याचे काहींनी सांगितले. अशाच एका भरधाव व्हॅनचा सोमवारी दुपारी अमरावतीमधील वडाळी परिसराजवळ अपघात झाला. चांदूर रेल्वे वरून प्रवासी घेऊन अमरावतीला आलेल्या व्हॅनच्या चालकाने लवकर पोहचून गाडीचा नंबर लागावा या उद्देशाने दुसऱ्या व्हॅनला ओव्हरटेक करण्याच्या नादात नियंत्रण सुटल्याने अपघात आला. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून एका चिमुकलीचा हाथ फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातानंतरही चांदूर रेल्वे व अमरावती पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
       अशातच अवैध वाहतूक करणारे वाहनधारक एस.टी.बस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरुन आपआपल्या दिशेने थाटात रवाना होतात. यामुळे एस.टी.प्रशासनाला चुना तर लागतोच शिवाय नागरिकांनाही आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूकीस वेळीच आळा बसविणे गरजेचे आहे.