शहरातील बंद पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य – नगर परीषद प्रशासन व सत्ताधारी यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप

0
717
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 

      चांदूर रेल्वे शहरातील दुभाजकावरील पथदिवे गेल्या १ वर्षापासुन बंद अवस्थेत आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय अनेक प्रभागातील पथदिवेसुध्दा अनेक वेळा बंद राहत असुन नगर परीषद प्रशासन व सत्ताधारी यांच्यावर दुर्लक्षाचा आरोप नागरीक करीत आहे.
चांदूर रेल्वे शहराचे सौदर्यींकरण व्हावे या दृष्टीने विशेष निधीतुन रेल्वे स्टेशन ते सिनेमा चौकपर्यंत दुभाजकावर दोन बाजुने जवळपास १०५ पथदिवे ४ वर्षांपुर्वी बसविण्यात आले. यामुळे शहराची शोभा वाढली असुन शहर चांगलेच प्रकाश झोतात राहत होते. याच मुख्य रस्त्यावरून नागरीकांची जास्त वर्दळ सुरू असते. रात्रीच्या वेळी तसेच पहाटे असंख्य प्रवासी रेल्वेतुन उतरत चौकाकडे येत असतांना सगळीकडे अंधार असतो. गेल्या १ वर्षापासुन सदर पथदिवे बंद असुन ते केवळ शोभेची वास्तु बनले आहे. पथदिवे बंद असल्याने रात्री मुख्य रस्त्यावर काळोख पहायला मिळतो. शुक्रवारी गाडगेबाबा मार्केट, शिक्षक कॉलनी रोड, राम नगर या भागांतील अनेक पथदिवे बंद अवस्थेत होते. याशिवाय शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद राहत असल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. बंद पथदिव्यांबाबत नगर परीषद प्रशासनाचे तसेच सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरवासी करीत आहे. त्यामुळे शहरातील दुभाजकासह संपुर्ण शहरातील पथदिवे कधी दुरूस्त होऊन शहरात प्रकाशझोत पहावयास मिळणार हे येणारा काळच सांगेल.

मॉर्निंग वॉक करणारे जातात टॉर्च घेऊन

पहाटेच्या दरम्यान अनेक शहरवासी मॉर्निंग वॉक करीता रेल्वे स्टेशनकडे जातात. परंतु पहाटेच्या वेळी बंद पथदिव्यांमुळे चक्क टॉर्च सोबत घेऊन शहरवासीयांना मॉर्निंग वॉकला जाणे भाग पडत आहे. याशिवाय येत्या ३ दिवसानंतर मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याला सुरूवात होणार असुन या अंधाराच्या साम्राज्यामुळे त्यांना सुध्दा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याची शक्यता आहे. 

निधी उपलब्धीसाठी प्रयत्नरत – सिओ पाटील

दुभाजकावरील पथदिव्यांची आतील वायरींग नादुरूस्त झाली आहे. याकरीता दुभाजक फोडण्याची आवश्यकता आहे. या संपुर्ण कामाकरीता अंदाजे १० ते १२ लाख रूपयांचा निधी अपेक्षीत आहे. ऐवढा निधी सद्या उपलब्ध नसुन याकरीता प्रयत्न सुरू असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांनी सांगितले.