घुईखेडमध्ये पावसाळ्यात ६ तर उन्हाळ्यात केवळ ३ टँकरने होत आहे पाणीपुरवठा – ११ वर्षांपासुन मुलभुत सुविधांपासुन वंचित

0
933

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

चांदुर रेल्वेवरून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड या गावाचे पुनर्वसन बेंबळा प्रकल्पांतर्गत गेल्या ११ वर्षांपुर्वी झाले. मात्र पुनर्वसनानंतर गाव भकास झाले आहे. कारण गावात नागरीकांना अद्यापही पुर्णपणे मुलभुत सोई सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही. बेंबळा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे गावातील समस्या पुर्णत्वास नाही जात आहे. पावसाळ्यात ६ टँकरने होणार पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात ३ टँकरवर आल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पांतर्गत गेल्या ११ वर्षांपासुन स्थलांतरीत झालेल्या तालुक्यातील घुईखेड पुनर्वसित गावांत नागरिकांना पाणी टंचाईमुळे पाण्याला वनवन फिरावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात उन्हाचा पारा चांगलाच तपत असतानाच आठ- दहा दिवसांनी टॅंकरने केला जात असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे पुनर्वसित नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. मात्र याकडे संबंधीत विभागाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसीत घुईखेड येथे दोन पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेची वास्तू ठरलेल्या आहे. येथे एकूण ७० स्टॅण्ड पोस्ट लावण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक स्टॅण्ड पोस्टपर्यंत पाइपलाइनच टाकली नसल्याचे समजते. बेंबळा प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्टॅण्ड पोस्ट चेक करूनच संबंधित कंत्राटदारांचे पेमेंट केल्याचे बोलल्या जात आहे. मात्र ३८ लाखांची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. बेंबळा पुनर्वसन विभाग यवतमाळतर्फे घुईखेडमध्ये केवळ ३ टँकरने पाणीपुरवठा सुरू असुन पावसाळ्यात मात्र ६ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.
यासोबतच अनेक नागरी सुविधांपासुन सदर गाव अजुनही वंचित राहिलेले आहे. गावातील अर्ध्याहुन जास्त पथदिवे बंद राहत असुन गावात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याचे समजते. गावातील रस्त्यांची झालेली दयनिय अवस्था गावाकऱ्यांची परिक्षाच घेत आहे. अनेक नागरीकांना भुखंड वाटप केला असतांना त्या भागात मात्र अजुनही रस्ते बनलेले नाहीत. गावात शेवटच्या टोकापर्यंत तर अद्यापही विज पोहचलेली नाही ही तर एक शोकांतीकाच म्हणावी लागेल. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी सुरूवातीला काही ठिकाणी जागा क्रिडांगणासाठी राखीव ठेवल्या होत्या. परंतु नंतर त्याही जागी नागरीकांना भुखंड वाटप करून दिले असुन गावात क्रिडांगण राहिलेले नाही. यासोबत जिल्हा प्राथमिक मराठी शाळा, घुईखेड या शाळेत ३ वर्षांपासुन सुरळीत पाणी पुरवठा सुरू करण्याची हमी दिली होती. मात्र अजुनही शाळेत व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसुन अनेकवेळा विद्यार्थ्यांचेसुध्दा पाण्याअभावी हाल होत असल्याचे बोलल्या जात आहे. गावामध्ये बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असुन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असलेल्या युवकांच्या बाबतीतसुध्दा शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलेले नाहीत.
अल्पशा पैशांमध्ये आपले भुखंड तसेच बांधलेले घर पुनर्वसात गेल्यानंतर कसे बसे नागरीकांनी नव्या जागेत घर बांधले. पुनर्वसीत गावात सर्व महत्त्वाच्या सुख सुविधा पुरविणे अशी तरतुद असताना गावाचे स्थलांतर होऊन कित्येक वर्ष उलटूनही यावर संबंधीत अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा, गावकरी हे अधिकार्‍यांच्या विरोधात सुध्दा चांगलेच संतापले असल्याचे चित्र आहे.