रेती ट्रकची मोजणी करणाऱ्या कोतवालाला चाकु दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न – रेती माफियाचा प्रताप

0
875
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे येथील चेकपोस्टवरील घटना
चेकपोस्ट वर नव्हती पोलीस सुरक्षा 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
       चांदूर रेल्वे येथील सोनगाव चौफुलीवरील चेकपोस्टवर नियमीतप्रमाणे रेतीच्या ट्रकची तपासणी करीत असतांना रेती ट्रकसोबत आलेल्या सहकाऱ्याने एका कोतवालाला चाकू दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.४० वाजता घडली. चेकपोस्टवर पोलीस सुरक्षा नसल्याने सदर घटना घडल्याचे समजते.
          प्राप्तमाहितीनुसार, बुधवारी (ता. १६) अंदाजे सकाळी ९.३५ वाजताच्या दरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी व नियंत्रण या मोहिमेत तहसीलदार, चांदूर रेल्वे यांच्या लेखी आदेशान्वये तलाठी प्रल्हाद पल्ले, लिपिक मोहन इंगोले, कोतवाल सुमित कदम, कोतवाल विश्वेश्वर पवार सर्व सोनगाव चौफुली येथे गौण खनिज तपासणीकरिता उपस्थित होते.  गौण खनिज तपासणी अंतर्गत ट्रकची तपासणी करीत असतांना तेवढ्यात अंदाजे सकाळी ९.४०च्या दरम्यान एमएच २७ एक्स ५७८९ या क्रमांकाचा ट्रक आला. त्यांनी या ट्रकला हात दाखवून त्याला थांबण्याची विनंती केली. यानंतर तलाठी पल्ले यांनी ट्रक ची रायल्टी दाखवा असे म्हटल्यावर ट्रकचालकाने त्यांना रायल्टी दाखविली. त्यानंतर लगेच त्यांचे सहकारी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीने आले. कोतवाल विश्वेश्वर विजय पवार (३०) यांना तलाठी प्रल्हाद पल्ले यांनी गाडी मोजण्यास सांगितले. तलाठी पल्ले यांच्या आदेशाने विश्वेश्वर पवार गाडी मोजण्यासाठी गेले पल्सर गाडी घेऊन आलेले इसम यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याजवळ असलेला धारदार चाकू काढून जीवे मारण्याकरिता अंगावर आले. तेव्हा विश्वेश्वर पवार मागे सरकले. नंतर त्यांचे सहकारी कोतवाल सुमित कदम यांनी त्या व्यक्तीला पकडले. त्यावर कदम यांनी त्याला सांगितले की, आम्ही आमचे घरचे काम करीत नाही शासनाचे काम करतो. आम्हाला मारून काय कराल? त्यावर तलाठी पल्ले व मोहन इंगोले यांनी त्याची समजूत घातली. त्यानंतर सदर युवक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन ‘तुम्ही माझ्या ट्रकला हात लावून दाखवा’ असे बोलून भरधाव वेगाने निघून गेले. सदर दोन व्यक्ती असुन एक तोतऱ्या भाषेत बोलत असल्याचे सांगितले व ट्रक चालक व मालक यांचे हे सहकारी असल्याचा संशय उपस्थितांनी व्यक्त केला. ट्रक चालक व मालक यांना या अनोळखी इसमाबद्दल विचारणा केली असता ते याबद्दल सविस्तर सांगू शकणार असल्याचे सांगितले. त्यांच्यामुळे कोतवालाच्या व चेक पोस्टवर नियुक्त केलेल्या सहकाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
             या घटनेची तक्रार विश्वेश्वर पवार यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला केली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. यावेळी सर्व तलाठी, कोतवाल पोलीस स्टेशनला उपस्थित होते.
पोलीस पाहत आहे जिव जाण्याची वाट? 
          सदर चेकपोस्टवर नियमितपणे सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत तलाठी, कोतवालासह एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यासाठी तहसिलदारांनी ठाणेदार यांना पत्र दिले होते. परंतु या चेकपोस्टवर पोलीस कर्मचारी नियमित वेळेवर येत नसल्याचे समजते. या घटनेच्या वेळीही पोलीस कर्मचारी चेकपोस्ट नव्हते. त्यामुळे पोलीस एखाद्या तलाठी, कोतवालाचा जिव जाण्याची वाट तर नाही पाहत आहे ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
रेती तपासणीच्या कामावर टाकणार बहिष्कार
            चेकपोस्टवर रेती ट्रकांच्या तपासणीच्या कामावर तलाठी संघटना, कोतवाल संघटना, मंडळ अधिकारी संघटना व महसुल कर्मचारी संघटना संयुक्तपणे लवकरच तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन बहिष्कार टाकणार असल्याची माहिती मिळाली आहे. काही महिण्यांपुर्वी संघटनेच्या वतीने जिवाला धोका असल्यामुळे चेकपोस्टवर पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. परंतु तरीही नियमीतपणे पोलीस सुरक्षा देण्यात आली नसल्याचे सांगितले आहे.