पाच दिवसांपासुन महसुल विभागाच्या चेकपोस्टवर सन्नाटा >< अवैध रेती वाहतुकदारांची बल्ले-बल्ले - अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

0
741
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .)
अवैध गौण खनिज वाहतुक तालुक्यातुन जोमात सुरू असतांना यावर लगाम बसविण्यासाठी महसुल विभागातर्फे उभारण्यात आलेल्या चेकपोष्टवर नुकताच कोतवालावर रेती माफियावर चाकु हल्ल्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे गेल्या ५ दिवसांपासुन महसुल कर्मचाऱ्यांनी सदर कामावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे चेकपोष्टवर सन्नाटा दिसत असुन रेतीचे ट्रक विना मोजल्याच भरधाव धावतांनाचे चित्र आहे.
        चांदुर रेल्वे तालुक्यातील अवैध गौणखनिज वाहतुक तपासणी करीता बायपास रोडवरील सोनगाव चौफुली येथे चेकपोष्ट उभारण्यात आले असुन दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत वाहणांची तपासणी १४ नोव्हेंबरपासुन नियमीत करण्यात येत होती. सदर चेकपोष्ट वरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्यामुळे व काही वाहने अवैध गौण खनिजाची वाहतुक करीत असल्याचे महसुल विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक होते. चेकपोष्ट वर ठरलेल्या वेळी नियमीतपणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आपल्या स्तरावरवरून करून त्यांना सदर ठिकाणी हजर राहण्याबाबत सुचना द्यावी असे एक पत्र स्थानिक तहसिलदार श्री. राजगडकर यांनी १६ नोव्हेंबर रोजी ठाणेदार यांना दिले होते. परंतु सुरूवातीला पोलीसांची नेमनुक करण्यात आलेली नव्हती. या चेकपोष्टवर अनेकवेळा तलाठी, मंडळ अधिकारी यांची गौण खनिज वाहतुकदारांसोबत बाचाबाची सुध्दा होते होती. एखादी परीस्थिती या कर्मचाऱ्यांच्या जीवावर सुध्दा बेतु शकते, त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त आवश्यक असल्याचे निदर्शनास आणुन दिले होते. त्यानंतर अखेर आता काही दिवसा अगोदर एका निशस्त्रधारी पोलीस कर्मचारी ड्युटी या ठिकाणी लावण्यात आली. परंतु तो ही कर्मचारी नियमीत वेळेवर येत नव्हता.
          अशातच पोलीस कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीत १६ मे रोजी चांदूर रेल्वे येथील सोनगाव चौफुलीवरील चेकपोस्टवर दररोजप्रमाणे रेतीच्या ट्रकची तपासणी करीत असतांना रेती ट्रकसोबत आलेल्या सहकाऱ्याने एका कोतवालावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोतवाल पवार मागे सरकल्याने व दुसरे कोतवाल कदम यांनी हल्लेखोराचा हात पकडल्याने अनर्थ टळला. चेकपोस्टवर पिण्याचे पाणी, सावलीकरीता टेन्ट, नियमितपणे शस्त्रधारी पोलीस कर्मचारी नसतांनाही जिव धोक्यात घालुन काम करावे लागत असल्यामुळे तलाठी संघटना, कोतवाल संघटना, मंडळ अधिकारी संघटना व महसुल कर्मचारी संघटना यांनी संयुक्तपणे तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन या कामावर १७ मेपासुन बेमुदत बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे गेल्या ५ दिवसांपासुन चेकपोस्टवर सन्नाटा पहावयास मिळाला. या बहिष्कारामुळे मात्र अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांची बल्ले-बल्ले झाल्याचे चित्र आहे. या चेकपोस्टवरून कोणतीही तपासणी न करता रेती वाहतुकीचे ट्रक भरधाव धावत आहे.
कर्मचाऱ्यासोबत एकाही अधिकाऱ्याने नाही केली चर्चा 
तलाठी, कोतवाल, मंडळ अधिकारी, महसुल कर्मचारी या संघटनांनी चेकपोष्टवरील कामावर बहिष्कार टाकल्यानंतर एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने यावर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. यामुळे रेतीवाल्यांसोबत अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याची चर्चा शहरात धडाक्यात सुरू आहे.