ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळय़ा बिबटय़ाची नोंद :-  बेल्जियमच्या दाम्पत्याने पहिले छायाचित्र घेतले

0
1495

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवणझरी येथील पाणवठय़ावर काळय़ा बिबटय़ाची नोंद घेण्यात आली आहे. बेल्जियम येथील दाम्पत्याने या काळय़ा बिबटय़ाचे छायाचित्र घेतल्यानंतर लगेच वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये देखील त्याचे दर्शन घडले. २०१४ नंतर दुसऱ्यांदा ताडोबात काळा बिबट दिसल्याने कॅमेरा ट्रॅप लावून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

बेल्जियमच्या दाम्पत्यासोबतच स्वसारा रिसोर्टचे व्यवस्थापक रणजीत भंडारी यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. तसेच छायाचित्रही उपलब्ध करून दिले. दरम्यान, आज सकाळी ताडोबाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी ताडोबात जाऊन माहिती घेतली. शिवणझरी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून ठेवले. काही वेळातच या कॅमेरा ट्रॅपमध्ये बघितले असता त्यात काळय़ा बिबटय़ाचे अध्रे छायाचित्र आलेले दिसले.