……… अन्यथा घागर माठ व घान कचरा घेऊन न.प. आवारात बसणार ! – भगवंत चौक व लहान मस्जिद परिसरात संतप्त नागरीकांचा इशारा

0
834
Google search engine
Google search engine
सुरळीत पाणीपुरवठा व साफसफाई करण्याची मागणी
नागरीकांचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
        मागील दोन महिन्यांपासून शहरातील भगवंत चौकात असलेल्या व्हॉल्वपासून भगवंत चौक व लहान मस्जिद परिसरात पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात व कमी वेळ होत आहे. या परिसरात पाणीटंचाईमुळे हाहाकार व असंतोष निर्माण झालेला असुन शहरात एकीकडे भरपूर प्रमाणात तीन-तीन तास पाणीपुरवठा केल्या जात आहेत तर या परिसरात फक्त अर्धा ते एक तास पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. तसेच या परिसरातील साफसफाईसुध्दा वेळेवर होत नाही आहे. तरी पाण्याचा सुरळीत पुरवठा व नाल्यांची नियमित साफसफाई करण्याची मागणी अनिस सौदागर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. अन्यथा घागर माठ व घान कचरा घेऊन न.प. आवारात बसण्याचा इशारा दिला आहे.
        भगवंत चौक व लहान मस्जिद परिसरातील नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळत नाही आहे. या परिसरातील सर्व विहिरी व बोर पूर्णपणे आटलेल्या असल्यामुळे व नगरपरिषदेचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरातील काही भागात भरपूर पाणी पुरवठा तर या परिसरात पाणीच नाही असा भेदभाव नगर परीषद येथील नागरिकांसोबत करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत असंतोष व संताप निर्माण होत आहे. यासोबतच या परिसरात नाल्यांची साफसफाई करणे मागील दोन महिन्यापासून बंद असुन कचरा उचलणारी घंटागाडी सुद्धा नियमित येत नाही. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा लवकरच असल्यामुळे नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. सदर बाबीकडे लोकांनी आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे कोणतेही लक्ष नसून आमच्या समस्या ऐकण्यासाठी सुध्दा वेळ नाही, अशा वेळेस आम्ही नागरिकांनी कुठे जावे हे कळत नसल्याचे सांगितले.
          तरी या परिसरात सर्व परिसरासारखे समान दोन-तीन तास सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, साफसफाई व नाल्यांची साफसफाई लवकरात लवकर करून देण्यात यावी अन्यथा नाईलाजाने स्वतः घागर माठ घेऊन व घाण-कचरा घेऊन नगर परिषदेच्या आवारात येऊन बसण्याचा इशारा अनिस सौदागर, जमील कुरैशी, नारायण गोल्हर, कुंदन राठोड, दिलीप बगाडे, तुकाराम सातोटे, रविंद्र हिरूळकर, दिगांबर नेमाडे, महेश प्रजापती, शामलाल नारेपार, निकेश प्रजापती, हरिष नारेपार, भारत सातोटे, पुजा नारेपार, नानीबाई सोनोने, बाबाराव वानखडे, शेख इक्राम, इस्माईल खान, मंगेश कुमले, सचिन नेवारे, अफसर खान, हसन शाह, शेख सत्तार, शेख गुलाब, शोभाबाई गायगोले, अरविंद बेराड, दामोधर पाटणे यांसह परिसरातील अनेक नागरीकांनी दिला आहे.