अवैध गावठी दारू अड्यावर कार्यवाहीसाठी गेलेल्या दोन पोलिसांवर प्राणघातक हल्ला – ४ आरोपी अटकेत

0
1298
Google search engine
Google search engine

आयजी, एसपींची घटनास्थळी भेट

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

           अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मांजरखेड (कसबा) गावालगतच सावंगा रोडवर असलेल्या तांड्याच्या बाजुला अवैध गावठी दारू अड्ड्यावर कार्यवाहीसाठी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढविण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामध्ये एकाची दगडाने ठेचुन निर्घृन हत्या करण्यात आली असुन एक पोलीस कर्मचारी गंभीर अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे.

         चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक शामराव कवडुजी जाधव (५५) आणि पोलीस कॉन्स्टेबल सतीश शरदराव मडावी (४१)  हे अवैधपणे चालणाऱ्या गावठी दारू अड्यावर कार्यवाही करण्यासाठी रविवारी (ता. २७) सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मांजरखेड येथील बंजारा तांड्यावरील शेतशिवारात येथे जात होते. या दोन पोलीस कर्मचाऱ्यांसोबत मांजरखेड येथील पोलीस पाटील प्रफुल्ल नारायण गुल्हाणे व सामाजिक कार्यकर्ते माधव देवराव कावलकर हे सुध्दा मांजरखेडवरून तांड्यावर जाणार होते. परंतु गुल्हाणे यांची तयारी व्हायची असल्यामुळे दोघे कर्मचारी पुढे निघाले. जाधव व मडावी अवैध गावठी दारू अड्डावर गेले असता तेथे आरोपींनी त्यांच्यावर त्यांच्यावर कुऱ्हाड, लाकडी काठी, दगडाच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी दारू बनविण्यासाठी उकडलेले पाणी सुध्दा दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर फेकले. यानंतर आरोपींनी पोलीसांना धावतधावत मारल्याचे समजते. घटनास्थळी पायांचे निशान आढळले असुन ठिकठिकाणी रक्ताचे थेंबसुध्दा दिसले. यामध्ये सतिष मडावी यांच्या डोक्यावर मोठ्या दगडाने सुध्दा मारल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर जखमी शामराव जाधव हे अतिगंभीर अवस्थेत घटनास्थळी पडुन होते. त्यानंतर पोलीस पाटील गुल्हाणे व कावलकर हे सकाळी ९.३० वाजता घटनास्थळी पोहचले असता त्यांना मडावी मृत तर जाधव जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी सर्वप्रथम जखमी पोलीस कर्मचारी जाधव यांना खाजगी वाहनाने प्रथम स्थानिक ग्रामिण रूग्णालयात आणले. यानंतर घटनेची माहिती चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला दिली. जाधव हे अतिगंभीर असल्यामुळे त्यांना रूग्णवाहिकेने तत्काळ इर्विणमध्ये रेफर करण्यात आले. इर्विणमधून गेट लाईफ रूग्णालयात हलविल्याची माहिती आहे.

          सदर घटनेची माहिती ठाणेदार शेळके यांनी अमरावती परिक्षेत्र महानिरीक्षक (आयजी) वाकडे, ग्रामिण पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार, अतिरीक्त पोलीस अधिक्षक मकानदार, आयपीएस समिर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी पालवे यांना दिली. यानंतर हे सर्व अधिकारी घटनास्थळी सकाळीच पोहचले होते. त्यानंतर तत्काळ जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, एलसीबी, सीआयडी, दंगा नियंत्रक पथक मांजरखेड व चांदूर रेल्वे परिसरात दाखल झाली होती. यानंतर चांदूर रेल्वे पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा केला. यानंतर ग्रामिण पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार यांच्या आदेशाने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय लसंते यांच्या नेतृत्वात दंगा नियंत्रण पथक व इतर पोलीसांची चमु आरोपींच्या अटकेसाठी रवाना झाली होती. घटनास्थळी श्वान पथक सुध्दा बोलाविण्यात आले होते. यानंतर सायंकाळपर्यंत पोलीसांच्या चमुंनी आरोपी बाल्या राठोड (३५) सह इतर तीन आरोपींना अटक केली असुन त्यांच्यावर भादवी ३०२,३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उर्वरीत आरोपींच्या अटकेसाठी पोलीसांच्या टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्या होत्या.

केवळ दोन पोलीस कर्मचारी धाड टाकण्यासाठी कसे गेले? 

सदर गावठी दारूवर धाड टाकण्यासाठी हे सदर दोन पोलीस कर्मचारी ऐवेंजर या दुचाकीने गेले होते. परंतु धाड टाकण्यासाठी जात असतांना सोबत १०-१२ पोलीसांची कुमत असते. त्यामुळे हे दोघेच पोलीस कर्मचारी तेही सिव्हील ड्रेसमध्ये धाड टाकण्यासाठी कसे गेले असा प्रश्न निर्माण झाला असुन निरनिराळ्या चर्चेंना उधान आले आहे.

त्या मृत  पोलीस कर्मचाऱ्यावर अमरावतीमध्ये अंत्यसंस्कार

या घटनेतील मृतक पोलीस कर्मचारी सतिष मडावी हे अमरावती मधील पोटे टाऊनशीमधील घर नंबर ४५७ मधील रहिवासी आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. मडावी यांचे स्थानिक ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह अमरावती येथील घरी पाठविण्यात आला. यानंतर त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच त्यांना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. 

प्रथमच पोलीसांचा एवढा मोठा ताफा चांदूर रेल्वेत

मिळालेल्या माहितीनुसार, आयजी, एसपी, एएसपी, आयपीएस अधिकारी, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, सीआयडी, दंगा नियंत्रक पथक, पोलीस कर्मचारी एवढा मोठा ताफा चांदूर रेल्वेत प्रथमच पहावयास मिळाला. यामध्ये विशेष म्हणजे आयजी व एसपी सकाळपासुन ते सायंकाळपर्यंत चांदूर रेल्वेतच तळ ठोकून बसले होते.