अखेर आठवडी बाजाराची वसुली करणाऱ्याला सिओंनी बजावली नोटीस – आठवडी बाजारात ‘पठाणी वसुली’ प्रकरण

0
901

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

चांदूर रेल्वे येथील आठवडी बाजारात ‘पठाणी वसुली’ करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली होती व दुपटीने मागितलेली रक्कम न दिल्यास पुढच्या रविवारी बाजारात दुकान न लावु देण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार दुकानदारांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली  होती. यावरून मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
चांदूर रेल्वे शहरात दर रविवारी साप्ताहीक आठवडी बाजार असते. याच साप्ताहीक बाजारामध्ये नगर परीषदतर्फे दर रविवारी वसुली करण्यात येत असुन सदर काम ठेकेपध्दतीने सुरू आहे. वसुलीचा ठेका एका सामान्य युवकाच्या नावाने घेतला असुन याची वसुली मात्र खुद्द कॉंग्रेसच्या महिला नगरसेविकेचे पती करतात व दबंगगिरी करीत १ काट्याला ५० रूपये तर २ काट्याला १०० रूपये म्हणजेच दुपटीने रक्कम वसुली करीत असल्याची तक्रार मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. नियमाप्रमाणे १ काट्याला ३० रूपये तर २ काट्याला ५० रूपये घेणे गरजेचे आहे. परंतु दुपटीने पैसे न दिल्यास पुढच्या रविवारी बाजारात दुकान लावू न देण्याची धमकीसुध्दा देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले होते. यावरून मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असुन यानंतर असा प्रकार घडु नये असे सांगितले आहे. मात्र यानंतरही असाच प्रकार घडणार की नियमाप्रमाणे वसुली होणार हे येणारा काळच सांगेल.

नगरसेविकेच्या पतीचा उल्लेख करणे टाळले

      दुकानदारांनी दिलेल्या तक्रारीत महिला नगरसेविकेचे पती वसुली करीत असल्याचे नमुद केले होते. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी याबाबतचा नोटीसमध्ये उल्लेख करणे टाळले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराला नगरसेविकेच्या पतीकडून वसुली करवून न घेता स्वत: किंवा दुसरा माणूस लावून नियमाप्रमाणे वसुली करण्याची ताकीद देणे गरजेचे होते. 

पैसे देऊन पावती घेणे महत्वाचे

     संबंधित ठेकेदाराकडुन दुपटीने रक्कम वसुल करतांना त्याची पावती सुध्दा देत नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे दर रविवारी दुकानदारांनी नियमाप्रमाणे १ काट्याला ३० रूपये तर २ काट्याला ५० रूपये वसुली करणाऱ्याला देऊन त्याची योग्य पावतीसुध्दा घ्यावी. याबद्दल आता दुकानदारांनी जागृत होणे तेवढेच महत्वाचे आहे.